बालेवाडी : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये मोठा गाजावाजा निर्माण झाला असून, मतदारांना पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाबुराव चांदेरे व अमोल बालवडकर यांच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आला आहे. संबंधित कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहात पकडल्याचा दावा करण्यात येत आहे.
ही बाब अपक्ष उमेदवार प्रमोद निम्हण यांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली. नागरिकांकडून संशयास्पद हालचालींबाबत फोन आल्यावर, निम्हण यांच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ बालेवाडी येथील चार चाकी गॅरेज जवळ घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. यावेळी पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ चित्रीकरण करून पुरावे जमा करण्यात आले.
घटनेची गंभीरता लक्षात घेता, कार्यकर्त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासन तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला असल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर पोलीस प्रशासन व निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, दोषींवर कोणती कारवाई होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक काळात अशा प्रकारांमुळे राजकीय वातावरण तापले असून, प्रभाग क्रमांक ९ मधील लढत अधिकच रंगतदार बनली आहे.
























