पुणे शहरात प्रदूषण करणाऱ्या 700 आस्थापनांवर दीड वर्षापासून कारवाई नाही; कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची राम बोरकर यांची मागणी

पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे विभागाच्या वतीने पुणे शहरात प्रदूषण करून पुणेकरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर दीड वर्ष होऊन अधिक कालावधी लोटला तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने कारवाई करण्यात आलेली नाही. पुणेकरांच्या जीविताशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांची त्वरित हकलपट्टी करण्याची मागणी मनसे शहर उपाध्यक्ष राम बोरकर यांनी केली आहे.

पुणे शहरात प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या सुमारे 700 हून अधिक आस्थापनांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. वास्तविकता नोटीसा बजावल्यानंतर संबंधित आस्थापनांची उत्तरे वेळेत न आल्यास एका आठवड्यात कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करीत नोटीस दिल्यानंतर दीड वर्ष होऊन देखील कारवाई केली जात नाही.

यामुळे कारवाई न झालेल्या आस्थापनांचे प्रदूषण सुमारे दीड वर्ष सातत्याने सुरूच असल्याचे दिसून येत आहे. संबंधित अधिकारी कारवाई करत नाहीत यामागे काही हितसंबंध आहेत का याबाबत देखील चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी कार्तिकेय लंगोटे यांच्या निदर्शनास सदरबाब आणून दिल्यानंतर देखील कारवाई होत नसल्याने. संबंधित अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी राम बोरकर यांनी केली आहे.

प्रदूषण करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई न करणाऱ्या उपप्रादेशिक अधिकाऱ्याची हाकालपट्टी करण्यात यावी यासाठी बुधवार दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वाकडेवाडी येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहर उपाध्यक्ष राम बोरकर यांनी दिला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी बाबासाहेब कुकडे यांच्याशी संपर्क साधला असता यांनी कार्यक्रमात असल्याचे कारण देत याबाबत प्रतिक्रिया दिली नाही.

See also  भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे “इंटर्नशिप व ऑन-द-जॉब ट्रेनिंग जनजागृती कार्यशाळा”