पुणे | प्रतिनिधी : प्रभाग क्रमांक ९ (बाणेर–बालेवाडी–पाषाण) येथील नागरिकांच्या समस्या, अडचणी व मागण्यांना केवळ शब्दांत मर्यादित न ठेवता त्यावर ठोस आणि वेळबद्ध कृती करण्याचा निर्धार अपक्ष उमेदवार पुनम विशाल विधाते यांनी व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी नागरिकांच्या मागण्यांचे लेखी प्रतिज्ञापत्र तयार करून अधिकृतपणे स्वीकारले आहे.
बाणेर–बालेवाडी नागरी मंच तसेच बाणेर–बालेवाडी–पाषाण रेसिडेंट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून नागरिकांकडून सूचना, तक्रारी व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. प्रत्यक्ष भेटी, सोसायट्यांमधील संवाद, गुगल फॉर्म, ई-मेल व चर्चासत्रांच्या माध्यमातून ६,४०० हून अधिक नागरिकांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला.
या प्रतिज्ञापत्रामध्ये रस्त्यांची दुरुस्ती व रुंदीकरण, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वाहतूक कोंडी, स्वच्छता, पार्किंग, स्ट्रीट लाइट्स, सीसीटीव्ही, आरोग्य केंद्रे, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, पर्यावरण संवर्धन, पावसाळी नाले स्वच्छता, खेळाची मैदाने, सुरक्षा व्यवस्था आदी महत्वाच्या नागरी प्रश्नांचा सविस्तर समावेश करण्यात आला आहे.
विशेषतः बालेवाडी, बाणेर, पाषाण व सुस परिसरातील वाहतूक समस्या, ड्रेनेज व पावसाळी पाणी साचण्याचे प्रश्न, स्मार्ट सिटी अंतर्गत रखडलेले प्रकल्प, मुळा नदी व पाषाण तलाव प्रदूषण, तसेच मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव या मुद्द्यांवर टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
यावेळी पुनम विधाते म्हणाल्या,“हे प्रतिज्ञापत्र म्हणजे निवडणुकीपुरते दिलेले आश्वासन नाही, तर नागरिकांच्या विश्वासावर दिलेली हमी आहे. प्रत्येक मुद्दा स्वतःच्या जबाबदारीने पूर्णत्वास नेण्याचा माझा संकल्प आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करताना पारदर्शकता, वेळबद्धता आणि सातत्य राखले जाईल.”
नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत, लोकप्रतिनिधींनी केवळ घोषणा न करता लेखी बांधिलकी स्वीकारणे ही सकारात्मक आणि आशादायी बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.


























