पुणे जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी दुसऱ्या दिवशी ७  उमेदवारी अर्ज दाखल

पुणे :- पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि.१७ जानेवारी) आणखी सात उमेदवारी अर्ज दाखल झालेआहेत. यामुळे गेल्या दोन दिवसांत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या आता नऊ झाली आहे. शनिवारी जिल्हा परिषदेसाठी चार तर, पंचायत समित्यांसाठी तीन उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत‌. पहिल्या दिवशी (शुक्रवारी) जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला होता‌. उमेदवारी अर्ज दाखल करणारांमध्ये बारामती, खेड आणि हवेली तालुक्यातील उमेदवारांचा समावेश आहे.

पुण्यासह राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे‌. निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या दि. २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानुसार शनिवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवस होता, असे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभागाच्या जिल्हा समन्वयक व रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी खेड तालुक्यातील दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या प्रत्येकी एका उमेदवारी अर्जाचा समावेश होता‌. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी आणखी सात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये झेडपी निवडणुकीसाठीच्या चार आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीच्या तीन उमेदवारी अर्जांचा समावेश आहे.  शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल झालेल्यांमध्ये खेड, हवेली आणि बारामती तालुक्यातील इच्छुकांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची अधिसूचना प्रसिद्ध होताच, पहिल्याच दिवशी  तब्बल १३०५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली होती. यामध्ये जिल्हा परिषद गटांसाठीच्या ५३५, पंचायत समिती गणांसाठीच्या ७७२ उमेदवारी अर्जांचा समावेश होता. शनिवारी आणखी ८९८ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेसाठीच्या ४०५ व पंचायत समित्यांसाठीच्या ४९३ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे.

See also  पाषाण येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सैन्य दलातील निवृत्त अधिकाऱ्यांचा सन्मान