स्वच्छता हीच सेवा अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी एक तास स्वच्छतेचा उपक्रमाचे आयोजन

स्वच्छतेचा उपक्रम जास्तीत जास्त लोकसहभाग मिळवून यशस्वी करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे, दि. २५: स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत येत्या १ ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छतेसाठी एक तास’ या उपक्रमाचे संपूर्ण देशात आयोजन करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त लोकसहभाग मिळवून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषदचे मुख्याधिकारी यांची दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार दीपक आकडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘स्वच्छता हीच सेवा’ हे प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी अभियान आहे. त्याअंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या अगोदरच्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान १ ठिकाण आणि नगरपरिषद यांनी प्रत्येक वॉर्डात २ ठिकाणे निवडून स्वच्छता विषयक कार्यक्रम आयोजित करावेत अशा सूचना आहेत. त्यानुसार सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत पातळीवर आयोजित करावयाच्या कार्यक्रमांचा आढावा घ्यावा.

ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, माझी वसुंधरा अभियान आदींचा चांगला अनुभव असल्याने गटविकास अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी यांनीही याबाबतच्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार स्वच्छतेसाठीची ठिकाणे निवडून लोकसहभाग घ्यावा. शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, बचत गट आदींना सहभागी करून घ्यावे. प्रत्येक गावात हा उपक्रम झाला पाहिजे, असे नियोजन करावे. या उपक्रमात स्वच्छतादूतांनाही सहभागी करुन घ्यावे, काही ग्रामपंचायतींनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत त्याचेही सादरीकरण यातून करता येईल, असेही ते म्हणाले.

धार्मिक आणि पर्यटन स्थळे, गड किल्ले, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, रेल्वेमार्गाची बाजूची ठिकाणे, रेल्वे अंडर ब्रिज आदी ठिकाणे निवडून स्वच्छतेचे नियोजन करावे. निवडलेल्या ठिकाणांची स्वच्छता निटपणे होईल याची दक्षता घ्यावी. शासकीय कार्यालयांनीही आपली स्वच्छ्ता मोहीम राबवावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण म्हणाले, या ग्रामीण तसेच शहरी भागात स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. १ ऑक्टोबर रोजी स्वच्छतेसाठी १ तास श्रमदानासाठी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी – कर्मचारी, शाळा, महाविद्यालये, अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घ्यायचा आहे. प्रत्येक गाव, नागरी स्वराज्य संस्थेत हा उपक्रम राबवावयाचा आहे. उपक्रमाची अंमलबजावणीचे दृश्य स्वरुपात परिणाम, छायाचित्रे यासाठीच्या वेबपोर्टलवर अपलोड करावयाचे आहेत. त्यादृष्टीने सर्वांनी नियोजन करावे, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांनी ठिकाणे निवडून याबाबतच्या सिटीझन पोर्टलवर ठिकाणे निश्चित करावयाचे आहेत. स्वच्छ्ता पूर्वीचे आणि स्वच्छतेनंतरचे फोटो अपलोड करायचे आहेत, अशाही सूचना योवळी देण्यात आल्या.

See also  क्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक – आरोग्यसेवा आयुक्त धीरज कुमार