टी-२० विश्वचषकावर भारताची मोहोर; न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव

अहमदाबाद : भारताने दमदार कामगिरी करत टी-२० क्रिकेट विश्वचषक जिंकत इतिहास रचला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करून विश्वचषकावर नाव कोरले.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ५ गडी गमावून २५५ धावा केल्या. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या ठरली.
भारताकडून संजू सॅमसन याने शानदार फलंदाजी करत ४६ चेंडूत ८९ धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि ८ षटकार लगावत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याला अभिषेक शर्मा (५२) आणि ईशान किशन (५४) यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे भारताने न्यूझीलंडसमोर २५६ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. न्यूझीलंडचा डाव १५२ धावांवर आटोपला. त्यांच्या बाजूने मिचेल सँटनरने ४३ धावा करत काहीसा प्रतिकार केला.

भारतातर्फे गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने ४ षटकांत १५ धावा देत ४ बळी घेत निर्णायक कामगिरी केली. त्याला अक्षर पटेलने ३ विकेट्स घेत चांगली साथ दिली. या शानदार विजयासह भारताने टी-२० विश्वचषक जिंकत पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात आपले वर्चस्व सिद्ध केले. या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात क्रिकेट चाहत्यांकडून जल्लोष साजरा केला जात असून टीम इंडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

See also  बाणेर येथील योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा योगीराज भूषण पुरस्कार व जीवनगौरव पुरस्कार सोहळा रविवारी संपन्न होणार