धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुण्यात जल्लोष; पाषाणमध्ये फटाके, पेढे वाटून आनंदोत्सव

पुणे, दि. २५ जुलै : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील पाषाण परिसरात विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजय जल्लोष साजरा केला.

यावेळी उपस्थितांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. तसेच शिक्षण व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी सातत्याने केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विद्यार्थीहिताला प्राधान्य देणारे निर्णय घेण्याची मागणी केली. “हा विजय विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा आहे,” अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

पाषाण परिसरात झालेल्या या जल्लोषात मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. संपूर्ण परिसर घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटपामुळे उत्साहपूर्ण वातावरणाने दुमदुमून गेला.

See also  नगर विकास विभाग हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे