पुणे : म्हाळुंगे परिसरात हायड्रोपोनिक गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.२० वाजण्याच्या सुमारास वारकवडे सोसायटी शेजारी, म्हाळुंगे येथे संशयास्पद हालचाली आढळून आल्या. त्यावेळी गोवर्धन रमेशकुमार (वय २४, रा. उत्तमनगर, बावधन) आणि विवेक सुनील चौधरी (वय २१, रा. उत्तमनगर, बावधन) यांना ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपींकडून २९ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. पुढील तपासात एकूण सुमारे ६० ग्रॅम गांजा, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि मोबाईल फोन असा एकूण ६,५०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हे अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत कलम ८(क), २०(ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहेत.
























