एनसीईआरटीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; छत्रपती फाउंडेशनचा तीव्र निषेध

पुणे | प्रतिनिधी (पुणे बुलेटीन)
पुण्यात आज छत्रपती फाउंडेशन (महाराष्ट्र) यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत NCERT च्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकल्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच हा नकाशा तात्काळ पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य हे केवळ प्रादेशिक सत्तेपुरते मर्यादित नसून भारताच्या राजकीय इतिहासात महत्त्वाची राष्ट्रीय शक्ती म्हणून ओळखले जाते. स्वराज्य, संस्कृतीचे रक्षण आणि देशाच्या सुरक्षेसाठी मराठ्यांनी मोठे योगदान दिल्याचा त्यांनी उल्लेख केला.

फाउंडेशनच्या वतीने यावेळी अनेक ऐतिहासिक पुरावे सादर करण्यात आले. यामध्ये पेशवा दफ्तरील पत्रे, राजपुताना गॅझेटमधील संदर्भ, अहमदनामा तह तसेच ब्रिटिश काळातील विविध नकाशांचा समावेश असून, या सर्व कागदपत्रांमधून मराठा साम्राज्याच्या सीमा आणि प्रभाव स्पष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेत यासंदर्भात झालेल्या चर्चेचा उल्लेख करताना राज्याचे मंत्री पंकज भोयर यांनी दिलेल्या उत्तराची आठवण करून देण्यात आली. आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना एनसीईआरटीने नकाशा फक्त हिंदी आणि उर्दू पाठ्यपुस्तकातून वगळल्याचे सांगितले होते आणि तो पुन्हा समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र, आता इंग्रजी पाठ्यपुस्तकातूनही हा नकाशा काढण्यात आल्याचा आरोप करत, विधानसभेतील आश्वासनांचे काय झाले, असा सवाल छत्रपती फाउंडेशनने उपस्थित केला.यावेळी संस्थेने स्पष्ट केले की, हा लढा कोणत्याही समाज किंवा प्रदेशाविरोधात नसून ऐतिहासिक सत्य आणि शैक्षणिक प्रामाणिकपणासाठी आहे. इतिहासाकडे प्रादेशिक दृष्टीकोनातून नव्हे तर राष्ट्रीय योगदानाच्या नजरेतून पाहिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

फाउंडेशनच्या प्रमुख मागण्या:
एनसीईआरटीच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये मराठा साम्राज्याचा नकाशा तात्काळ पुनर्स्थापित करावा
नकाशा हटवण्यामागील कारणांबाबत सार्वजनिक स्पष्टीकरण द्यावे
शैक्षणिक बदलांपूर्वी तज्ज्ञ इतिहासकारांचा सल्ला घ्यावा
मराठ्यांच्या योगदानाचा योग्य सन्मान राखावा
तसेच, या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला असून, संविधानिक मार्गाने लढा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मराठा समाजाची सभा आणि जनजागृती मोहीम राबवण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला.
शेवटी, “नकाशे पुस्तकातून काढता येतील, पण इतिहासातून मराठ्यांचे स्थान कोणीही काढू शकत नाही,” असा ठाम संदेश छत्रपती फाउंडेशनने दिला.

See also  आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत भरीव तरतूद करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे