पुणे : मायेच्या उबेत वाढणाऱ्या निरागस चेहऱ्यांमध्ये जेव्हा सत्तेचा नव्हे तर स्नेहाचा स्पर्श मिसळतो, तेव्हा तो क्षण केवळ औपचारिक राहत नाही तो हृदयात साठवून ठेवावा असा अनुभव ठरतो. अशाच भावुक वातावरणात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन बालगृहातील अनाथ मुलींमध्ये रमल्या.
‘आपुलकीचा संवाद’ या उपक्रमातून माईंच्या कार्याला अभिवादन करत त्यांनी मुलींच्या कलागुणांना दाद दिली आणि त्यांच्या इतिहासप्रेमाला मनापासून सलाम केला. संस्थेत आगमन होताच प्रवेशद्वाराजवळ चिमुकल्या मुलींनी स्वागत ताई म्हणत गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांनी माईंच्या पुतळ्याला आणि प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. त्या क्षणी वातावरणात एक वेगळीच भावूकता दाटून आली होती. माई आज आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या कार्याच्या रूपाने त्या प्रत्येक हृदयात जिवंत आहेत, ही भावना सर्वांच्या मनात दाटून आली.
मुलींमध्ये मिसळून, त्यांच्याशी संवाद साधताना मंत्री अदिती तटकरे या अक्षरशः त्या निरागस जगात रमल्या होत्या. त्यांनी सांगितले की, “संस्कार आणि विचार रुजविणे आजच्या काळात अतिशय कठीण झाले आहे. पण माईंच्या सर्व संस्थांमध्ये हे काम अत्यंत सुंदर आणि प्रभावी पद्धतीने सुरू आहे. अनेक संस्था संगोपन करतात, पण माईंची संस्था समानतेने, मायेने आणि संस्कारांनी अनाथ मुलांचे संगोपन करत असल्याचे पाहून मनाला प्रचंड समाधान मिळते, असेही श्रीमती तटकरे म्हणाल्या.
कार्यक्रमादरम्यान कु. सारिका आणि कु. पावनी यांनी माईंच्या जीवनावर प्रकाश टाकत अत्यंत हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या शब्दांतून माईंच्या आयुष्याची वेदना, संघर्ष आणि मातृत्वाचे दर्शन घडले. यानंतर चिमुकल्या मुलींनी सादर केलेला ऐतिहासिक पोवाडा हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या पोवाड्यातून मुलींनी युद्धकाळातील प्रसंग जिवंत केले. इतिहासाची इतकी सखोल जाण आजच्या पिढीतील मुलींमध्ये पाहून मंत्री तटकरे या भारावून गेल्या.
श्रीमती तटकरे म्हणाल्या, आजच्या चिमुकल्या पिढीला आपला संपूर्ण इतिहास माहिती आहे, ही अतिशय अभिमानाची आणि महत्त्वाची बाब आहे.” माईंच्या सहवासाच्या आठवणी सांगताना त्या भावूक झाल्या. माझ्या वयाचे फार कमी लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना माईंचा सहवास लाभला. २००९ पासून मी माईंचे अनेक कार्यक्रम घेतले आहेत. आज त्यांच्या संस्थेत आल्यावर मन गहिवरून आले. माई आज हयात नाहीत याचे दुःख आहे, पण त्यांच्या कार्यातून त्या कायम आपल्या सोबत आहेत,” असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी मंत्री श्रीमती तटकरे यांच्या हस्ते बालगृहातील मुलींना फळांचे वाटप करण्यात आले.संस्थेच्या अध्यक्षांनी शाल श्रीफळ आणि तुळशीचे रोप भेट देऊन सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदन (बालगृह) कुंभारवळणचे अध्यक्ष दिपक गायकवाड, ममता सपकाळ, विनय सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य रुपाली अमोल झेंडे, सभापती अमित झेंडे, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, बालगृहातील मुली आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मुकेश चौधरी यांनी केले. ‘आपुलकीचा संवाद’ हा कार्यक्रम केवळ औपचारिक नव्हता, तर तो मायेच्या सावलीत घडलेला एक भावनिक मिलाफ होता ज्यात माईंच्या आठवणी, मुलींचे निरागस हास्य आणि संस्कारांची श्रीमंती एकवटली होती.
ममता बाल सदन, कुंभारवळण येथे झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष दिपक गायकवाड यांनी अनाथ मुलांच्या आधार नोंदणीतील अडचणींबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी अनाथ मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना सुचविणारे ५१ पानांचे सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनाची गांभीर्याने दखल घेत मंत्र्यांनी हा विषय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत मांडण्याची ग्वाही दिली. तसेच आपल्या सचिवांना बोलावून संबंधित बैठकीत हे निवेदन सादर करण्याच्या सूचना दिल्या. अनाथ मुलांच्या प्रश्नांबाबत शासन पातळीवर सकारात्मक पावले उचलली जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
बाल विकास मंत्र्यांसमोर गप्पांचा रंग अधिकच खुलला..
ममता बाल सदन, कुंभारवळण येथे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी चिमुकल्या मुलींशी मनमोकळा संवाद साधला. “तुम्हाला काय आवडते, कोणते खेळ खेळता, कोणती पुस्तके वाचता?” असे अनेक प्रश्न त्यांनी मुलींना विचारले. मुलींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंदाने आपल्या आवडी-निवडी व्यक्त केल्या. मंत्र्यांसमोर आपण आहोत याचे भान न राहता गप्पांचा रंग अधिकच खुलला. या आपुलकीच्या संवादातून मुलींच्या चेहऱ्यावर निरागस आनंद आणि आत्मीयतेची झलक दिसून आली.
























