खानवडीत ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचे मुळगाव खानवडी (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा परिषदेकडून उभारण्यात आलेल्या ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’ उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्याक मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, शिक्षण राज्यमंत्री योगेश कदम आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावात उभारलेली ही अत्याधुनिक शाळा म्हणजे द्विशताब्दी वर्षाची सर्वात योग्य सुरुवात आहे. सीबीएसई पॅटर्नवरील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा असून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यास हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.  शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्तरावर झेप घेण्याची क्षमता निर्माण होत असून काही विद्यार्थिनी इस्रो आणि नासासारख्या संस्थांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून या शाळेची उभारणी झाली असून त्यांनी शाळा उभारणीच्या  प्रत्येक टप्प्यावर लक्ष घातल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फ्रेंच व जर्मनसारख्या परकीय भाषा आत्मसात केल्या आहेत, हे बदलत्या शिक्षण व्यवस्थेचे द्योतक असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य विकासाची एक हजार केंद्रे उभारणार
पुणे जिल्हा परिषदेकडून ‘इंडस्ट्री ४.०’ अंतर्गत १०० शाळांमध्ये १०० अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली असून भविष्यात अशी एक हजार केंद्रे उभारण्यात येतील असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

See also  रस्ते, नाले, स्वच्छता वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध - नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आश्वासन

महात्मा फुले हे दूरदृष्टीचे विचारवंत आणि थोर समाजसुधारक
महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते प्रगतशील शेतकरी, यशस्वी उद्योजक आणि दूरदृष्टीचे विचारवंत होते. शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना वर्षभर उत्पन्न मिळवून देणारे मॉडेल त्यांनी तयार केले. शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला. मुंबई महानगरपालिकेची इमारत, खडकवासला धरण, येरवडा कारागृह आणि कात्रज बोगदा यांसारख्या प्रकल्पांमध्ये त्यांची दूरदृष्टी दिसून येते, असे त्यांनी नमूद केले.

स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांनी भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा देत विधवांचे केशवपन थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून पहिली शिवजयंती साजरी करण्याचे कार्यही महात्मा फुले यांनीच केले, असे त्यांनी सांगितले. आजचा शिक्षणाचा अधिकार कायदा ही त्याच विचारांची फलश्रुती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत राज्य शासन ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ राबवत असून त्याअंतर्गत नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. ‘महाज्योती’च्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, महात्मा फुले यांच्या जन्मतिथीबाबत संशोधनातून ११ एप्रिल १८२७ ही तारीख निश्चित झाली आहे. सावित्रीबाई फुले यांनी १८९१ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘महात्मा फुले यांचे अमर जीवन’ या ग्रंथात या तारखेचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य बहुजन समाजाला शिक्षित करणे हेच होते. त्याच विचारातून खानवडी येथे उभारलेली ही आधुनिक सीबीएसई शाळा ही त्यांच्या कार्याची पुढची पायरी आहे. महात्मा फुले हे ‘नेशन बिल्डर’ होते तसेच अंधश्रद्धा आणि ब्राह्मण्यवादी प्रवृत्तींच्या विरोधात लढणारे विचारवंत होते. त्यांच्या कार्यात विविध समाजघटकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समतेचा आदर्श निर्माण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय हा त्यांच्या विचारांना दिलेली खरी आदरांजली असल्याचे श्री. भुजबळ म्हणाले.

See also  मोदींची गॅरंटी खोटी; ती चालणार नाही भाजपाने आश्वासने दिली पण ती पूर्ण केली नाही - शरद पवार

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी महात्मा फुले यांच्या जन्मगावातून द्विशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. खानवडी येथे महात्मा फुले यांच्या मूळ घराची प्रतिकृती  तसेच नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे १० ते १२ कोटी रुपयांचा प्रकल्प कटगुण येथे तर नायगाव येथे सुमारे १५० कोटी रुपयांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी या शाळेच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार होणार असून ग्रामीण विद्यार्थ्यांना नवे दालन उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.

प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. खानवडी येथे १२ एकर जागेवर उभारलेल्या या शाळेत प्रयोगशाळा आणि सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. ही शाळा ज्युनिअर केजी ते इयत्ता १२ वीपर्यंतची सीबीएसई पॅटर्नची असून गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाणार आहे. पुढील वर्षापर्यंत २८० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे वसतिगृह पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्ताने महात्मा फुले स्मारकात जाऊन अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. फडणवीस यांनी शाळा संकुलास भेट देत विविध सुविधा पाहणी केली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सायकल बँक योजनेचे लोकार्पण करण्यात आले.

जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण असलेल्या शैक्षणिक दालनास मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन उपक्रमांची माहिती घेतली.  जिल्हा परिषद शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या ८८ विविध लॅब्सचे उद्घाटनही मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार योगेश टिळेकर, राहुल कुल, शंकर मांडेकर, बापूसाहेब पठारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे , उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त अमित सैनी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, तसेच जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.