पुणे : पुणे आरएमसी असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासन व विविध प्राधिकरणांच्या सहकार्याने पुण्यातील रेडी मिक्स काँक्रीट (RMC) उद्योग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. उद्योगासमोरील अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल असोसिएशनने सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत.
मा. जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), पुणे महानगरपालिका (PMC), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) तसेच PMRDA यांनी एकसमान आणि व्यवहार्य मानक कार्यपद्धती (SOP) तयार करण्यासाठी सहकार्य केल्याचे असोसिएशनने नमूद केले.
तसेच NAREDCO, CREDAI, MBVA, BAI, PESA, CCPA, ICI आणि ISSE या उद्योग संघटनांसह सर्व हितचिंतकांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. प्रसारमाध्यमे आणि पुणेकर नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दलही असोसिएशनने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
आज झालेल्या अंतर्गत बैठकीत ३०० हून अधिक सदस्यांशी चर्चा करून आणि प्रशासनाशी झालेल्या संवादाचा आढावा घेतल्यानंतर, पुणे जिल्ह्यातील RMC उद्योग ९ मे २०२६ पासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी, PMC, वाहतूक पोलीस आणि MPCB यांनी दिलेल्या सर्व नियम व मार्गदर्शक सूचनांचे पूर्ण पालन करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि जबाबदार उद्योग पद्धती यासाठी पुणे आरएमसी असोसिएशनतर्फे नागरिकांसाठी टोल-फ्री हेल्पलाइन उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. ट्रान्झिट मिक्सरकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन, धोकादायक वाहनचालक, आरएमसी वाहन किंवा प्लांटमुळे होणारे प्रदूषण अथवा नागरिकांना होणारा त्रास यासंदर्भात नागरिकांना तक्रार नोंदवता येणार आहे. यासाठीचा टोल-फ्री क्रमांक लवकरच जाहीर करण्यात येणार असून सर्व तक्रारींवर संबंधित प्राधिकरणांच्या समन्वयाने कारवाई करण्यात येईल, असे असोसिएशनने सांगितले.
“शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण आणि पायाभूत सुविधा विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काँक्रीट हा जगभरात पाण्यानंतर सर्वाधिक वापरला जाणारा पदार्थ असून RMC उद्योग हा समस्या नसून शाश्वत बांधकाम क्षेत्राचा अविभाज्य भाग आहे. आम्ही समस्या नाही, तर उपायाचा भाग आहोत,” असे पुणे आरएमसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पोपटराव वाल्हेकर यांनी सांगितले.















