पुणे : देशात आणि जगभरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती, वाढते भू-राजकीय तणाव आणि त्यातून निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान Narendra Modi यांनी नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी नगरसेविका तथा शहर सुधारणा समितीच्या उपाध्यक्षा सपना आनंद छाजेड यांनी खासगी वाहनाऐवजी Maha Metro ने प्रवास करत इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश दिला.
“बदलाची सुरुवात स्वतःपासून” या भावनेतून केलेल्या या कृतीमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या वापराबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. वाढती वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण आणि इंधन खर्च कमी करण्यासाठी नागरिकांनी मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुणे मेट्रो प्रकल्प हा शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच प्रदूषण आणि इंधन वापर घटविण्यासाठी महत्त्वाचा पर्याय मानला जात आहे. अधिकृत माहितीनुसार मेट्रोमुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होऊन इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणास मदत होत आहे.















