विकसित भारतासाठी शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे : पद्मश्री राजदीप सरदेसाई

पुणे : विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल, तर शिक्षण क्षेत्रात देशाने अग्रेसर होणे अत्यावश्यक आहे. पायाभूत सुविधांच्या उभारणीबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम पत्रकार, प्रख्यात लेखक तथा पद्मश्री राजदीप सरदेसाई यांनी केले.

भारती विद्यापीठाच्या ६२ व्या वर्धापन दिन समारंभात पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल राजदीप सरदेसाई यांना ‘डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. दोन लाख एकावन्न हजार रुपये, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.

या कार्यक्रमास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह तथा समारंभाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे, डॉ. के. डी. जाधव, जी. जयकुमार तसेच आमदार भीमराव तापकीर उपस्थित होते. पुणे-सातारा रस्त्यावरील भारती विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुल परिसरात रविवारी दि. १० मे २०२६ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ‘विचार भारती’च्या वर्धापन दिन विशेषांकाचे आणि ‘विश्वभारती’ न्यूज लेटरचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याचबरोबर आदर्श सेवकांना ‘सेवा गौरव’ पुरस्कार तसेच उत्कृष्ट संशोधन पुरस्कारांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आजच्या पत्रकारितेवर भाष्य करताना राजदीप सरदेसाई म्हणाले की, सध्याच्या दूरचित्रवाहिनी पत्रकारितेत आवाज अधिक आणि वृत्त कमी अशी परिस्थिती दिसून येते. वृत्तवाहिन्यांवर सातत्याने वादविवादांचे वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे युवा पिढीसमोर भारताचे सकारात्मक चित्र उभे राहत नाही. पत्रकारांकडे राजकारण्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आणि नैतिक धैर्य असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

See also  चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान

डॉ. पतंगराव कदम यांनी वादळातही शिक्षणाचा दिवा तेवत ठेवण्याचे कार्य केले, असे गौरवोद्गार काढत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी शिक्षण जितके महत्त्वाचे आहे तितकेच जनतेच्या मालमत्तेचे संरक्षण करणेही आवश्यक आहे. लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक सरकार चालविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकार कुणा एका पक्षाचे नसते, त्यामुळे मंत्री म्हणून प्रामाणिकपणा आणि इमानदारी आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी शासनाचे कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, असे स्पष्ट केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे शासनासाठी बंधनकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पश्चिम महाराष्ट्राबरोबरच दिल्लीपर्यंत भारती विद्यापीठाचे शैक्षणिक कार्य पोहोचल्याचा गौरव करत त्यांनी राज्याची उपराजधानी नागपूर येथेही भारती विद्यापीठाचे शैक्षणिक कार्य अधिक जोमाने सुरू व्हावे यासाठी ‘ट्रिट-बीट’ पॉलिसीच्या माध्यमातून शैक्षणिक संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा मार्ग काढू, अशी ग्वाही दिली.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की, सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी भारती विद्यापीठाने आराखडा तयार केल्यास राज्य शासन त्याचा सकारात्मक विचार करून स्वीकार करेल. पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, बहुजन समाजापर्यंत शिक्षण पोहोचविण्याच्या उदात्त ध्येयाने डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. आज महाराष्ट्रासह देशाच्या उभारणीत भारती विद्यापीठातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात योगदान देत आहेत, ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे.

भारती विद्यापीठाला शंभरहून अधिक पेटंटस्‌ आणि शंभर कोटी रुपयांहून अधिक संशोधन अनुदान प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारती विद्यापीठाचे कार्य निरंतर सुरू असून देशाची भावी पिढी घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे त्यांनी नमूद केले.

See also  पुण्यात निवडणुकीची धग वाढली : प्रभाग क्र. ९ मध्ये थेट अजितदादांना सवाल करणारे बॅनर्स झळकले

प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. के. डी. जाधव यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र उत्तुरकर आणि प्रा. डॉ. ज्योती मंडलिक यांनी केले. मानपत्राचे वाचन प्रा. जागृती ठाकूर यांनी केले.