पुणे : सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक मराठी शाळा येथील मुख्याध्यापक विजय रुपलाल श्रीवास्तव यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
प्राईम टायकून मीडिया यांच्या वतीने कोथरूड येथील एम.ई.एस. ऑडिटोरियम येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्राईम टायकून मीडियाचे सीईओ निलेश साबे, बाबासाहेब दिघे, नवनाथशेठ येवले तसेच जयश्रीताई तायडे यांच्या हस्ते श्रीवास्तव यांचा गौरव करण्यात आला.
श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमूल्ये रुजविणे, शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करणे तसेच पालक-शाळा समन्वय वाढविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने विविध उपक्रमांत उल्लेखनीय यश मिळविले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील, उपाध्यक्ष अनुराग पाटील, संस्थापिका व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्रीवास्तव यांचे अभिनंदन केले.
















