बिबवेवाडी : दुपारी ०१•२३ वाजता ६५८, बिबेवाडी, अप्पर डेपो ओसवाल दवाखान्याच्या समोर काळे अँड सन्स गोडाऊनमध्ये भीषण आग लागल्याची वर्दि नियंत्रण कक्षात प्राप्त होताच दलाकडून तातडीने अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली.
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, आगीने रौद्र रूप धारण केले असून आजूबाजूला वस्ती असल्याने तात्काळ आगीवर चार ही बाजूने पाण्याचा मारा करीत कोणी जखमी अथवा आगीत अडकले नसल्याची खाञी केली. सदर ठिकाणी मंडप साहित्याचा मोठा साठा असलेले आठ हजार चौरस फुटाचे गोडाऊन होते. आगीमध्ये त्या ठिकाणचे कार्पेट आणि कापड व इतर सजावट साहित्याला मोठ्या प्रमाणात आग होती. तिथेच असलेला एक चारचाकी टेम्पो व सात दुचाकी वाहने जळाली तसेच चार ते पाच सिलेंडरचे स्फोट झाले. या आगीत कोणी जखमी वा जिवितहानी नसून अग्निशमन दलाने वेळेत बजावलेल्या कार्यामुळे मोठा अनर्थ टळला असून यावेळी स्थानिक नागरिक, पोलिस, महावितरण यांनी सहकार्य केले. अग्निशमन दलाकडून ७ अग्निशमन वाहने व ३ वाॅटर टँकर तसेच मनपा विभागाचे ११ टँकर उपलब्ध झाले होते. पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाकडून एक अग्निशमन वाहन दाखल होते.
या कामगिरीत मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, समीर शेख, सुनील नाईक नवरे, कैलास शिंदे आणि जवळपास ५० जवान यांनी आग विझवण्यात मोठी कामगिरी बजावली.”आगीची भीषणता व नागरिकांकडून नियंत्रण कक्षात सतत येणारे फोन पाहता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने चार ही बाजूने अधिक अग्निशमन वाहने पाठवत आजूबाजूला नागरी वस्ती व दुकाने पाहता आग इतरञ न पसरु देता जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले व धोका टाळला. यामुळे सुदैवाने मोठी हानी टळली.”- देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी
“आगीची भीषणता व नागरिकांकडून नियंत्रण कक्षात सतत येणारे फोन पाहता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने चार ही बाजूने अधिक अग्निशमन वाहने पाठवत आजूबाजूला नागरी वस्ती व दुकाने पाहता आग इतरञ न पसरु देता जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले व धोका टाळला. यामुळे सुदैवाने मोठी हानी टळली.”- देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी
















