करदात्यांच्या पैशावर राजकीय चमकोगिरी?
बाणेर येथील ‘आपुलकी कॅन्सर हॉस्पिटल’च्या नामकरणावरून नवा वाद

पुणे : बाणेर येथील पुणे महानगरपालिका आणि आपुलकी मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या ‘आपुलकी हेल्थकेअर कॅन्सर हॉस्पिटल’च्या नामकरणावरून नवा वाद निर्माण झाला आहे. हॉस्पिटल परिसरात स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे “स्वर्गीय यशवंतराव भिमाले” असे नाव असलेले फलक लावण्यात आल्याने स्थानिक नागरिक, माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्थानिक पातळीवर असा आरोप केला जात आहे की, पुणे महानगरपालिकेच्या नामकरण समितीला तसेच परिसरातील लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हे नामकरण करण्यात आले. महापालिकेच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक आरोग्य प्रकल्पाला एका राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचे नाव देण्यात आल्याने “करदात्यांच्या पैशावर राजकीय चमकोगिरी” सुरू असल्याची टीका होत आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी बालेवाडी परिसरातील ‘सेलिब्रिटी पार्क’ उद्यानालाही भिमाले यांच्या कुटुंबीयांचे नाव देण्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता कॅन्सर हॉस्पिटललाही यशवंतराव भिमाले यांचे नाव देण्यात आल्याने भाजपामधीलच काही पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा रंगली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक प्रकल्पांना नावे देताना पारदर्शक प्रक्रिया, सर्वसाधारण सभेची मंजुरी आणि नामकरण समितीची शिफारस आवश्यक असते. मात्र या प्रकरणात अशा प्रक्रियेचे पालन झाले का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित फलक रातोरात लावण्यात आल्याचाही आरोप काही स्थानिकांनी केला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर पुणे महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित पदाधिकाऱ्यांकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र या नामकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून विरोधकांकडून चौकशीची मागणी होण्याची शक्यता आहे.

See also  वसुंधरा अभियान कडून कडुलिंबाचे झाड लावून गुढीपाडवा नववर्षाचे स्वागत