पुणे : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे; बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी अशा प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, विभागीय कृषि सहसंचालक रफिक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे आदी उपस्थित होते.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला असून ही बाब समाधानाची आहे, असे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, पुणे जिल्ह्यात संसाधनांची कमतरता नाही तसेच शेतकरीही प्रगतीशील आणि कल्पक आहेत त्यामुळे विभागाने कृषी विकासासाठी लघुकालीन आणि दीर्घकालीन कार्यवाहीकडे लक्ष द्यावे. बियाणे, किटकनाशकांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी, अहवाल करत गुन्हे दाखल करावेत. नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण आणि त्यासाठी परिसंस्था निर्माण केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला चालना मिळणार नाही. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत.
खत निर्मिती कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत बफर साठ्यासाठी त्यांना निश्चित करुन दिलेला पुरवठा करावा. खतांच्या वाहतुकीबाबत योग्य ते नियोजन करावे. युरिया खताच्या पुरवठ्याबाबत नियोजन करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
खरीपातील सर्व पिकांच्या बियाणे उपलब्धतेबाबत आढावा घेऊन सोयाबीन लागवडीला चालना देताना घरचे बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पडीक जमिनीवर बांबू लागवडीचा उपक्रम चांगला असून त्याचे मार्केट लिंकेज केल्यास शेतकरी बांबू लागवडीस पुढे येतील.
पारंपरिक दृष्टीकोनातून बाहेर येत फळबागांमध्ये सर्वसाधारण भागांमध्ये पेरु तसेच पुरंदर आदी भागांमध्ये सीताफळ, अंजीर जिथे शक्य तेथे ड्रॅगनफ्रुट लागवडीवर भर दिल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर होईल. कमी धोका घेत एक्झॉटिक भाजीपाल्याच्या लागवडीलाही चालना देता येईल. शेतकऱ्यांना शाश्वत पिके घेण्यास प्रोत्साहित करावे, असेही ते म्हणाले.
पुणे, मुंबईसारखी मोठी बाजारपेठ जवळ असताना दर्जेदार कृषीमालाला मोठी मागणी आहे. कृषीमाल निर्यातीबरोबरच देशांतर्गत व जवळच्या मोठ्या बाजारपेठांसाठी दर्जेदार शेतमाल, फळे, भाजीपाला कृषीमाल पुरवल्यास त्याचा आर्थिक लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल हे शेतकऱ्यांना पटवून दिले पाहिजे.
पीक कर्जवाटपात पुणे जिल्ह्याने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली असून पुढेही अशीच कामगिरी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री. नायकवडी यांनी भाजीपाला आणि फळांच्या निर्यातीलसाठी व्हेजनेट आणि फ्रुटनेट सुविधेबाबत माहिती दिली. खते कंपन्यांनी विभागाच्या सूचनेनुसार आवश्यक तेथे खतांचा पुरवठा करावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. काचोळे यांनी सादरीकरणात सांगितले, जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र सुमारे २ लाख हेक्टर आहे. गेल्या तीन हंगामात सुमारे ३० हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून यावर्षी ३६ हजार क्विंटलच्या मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी आवंटनानुसार खताचा पुरवठा होत आहे. युरियाची होणारी मागणी पाहता शासनाने जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार जिल्ह्यात खतांचा १० हजार ३३० मे. टन. संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार युरियाचा ९ हजार ४६० मे. टन आणि डीएपीचा ८७० मे. टनचा बफर साठा करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रधानमंत्री पीक विमा योजना, पीएम- किसान योजनेची ई-केवायसी, निविष्टा गुणवत्ता नियंत्रण, कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, राष्ट्रीय कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, कृषीपंप वीजजोडणी, जिल्ह्यातील धरणप्रकल्पातील पाणीपरिस्थिती, अवेळी पाऊस आणि अन्य कारणामुळे मार्चअखेर झालेल्या नुकसानीचे पैसे वितरण, गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून देण्यात आलेले अनुदान आदी माहिती देण्यात आली.
श्री. हिरेमठ यांनी आत्मा यंत्रणेकडून राबविण्यात येणाऱ्या शेतीशाळा, सेंद्रीय शेती प्रकल्पाबाबत सादरीकरण केले.