हडपसर बनावट दारू प्रकरण : आमदार रोहित पवार यांची मृतांच्या कुटुंबीयांना भेट, न्यायाची मागणी

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात बनावट दारूमुळे मृत्यू झालेल्या यशवंत पवार आणि अरूण वामन दादर यांच्या कुटुंबीयांची रोहित पवार यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबीयांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, यशवंत पवार यांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाला असताना संबंधित शासकीय यंत्रणांनी कुटुंबीयांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारण सांगितले. पोलीस आणि आरोग्य विभागाने मृत्यूचे खरे कारण का लपवले, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

स्थानिक पोलीस आणि बनावट दारू व्यवसायिकांच्या संगनमतामुळे पुण्यातील १८ कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून हे मृत्यू म्हणजे व्यवस्थेच्या निष्काळजीपणातून घडलेले खून असल्याची भावना पिडीत कुटुंबीयांनी व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरात वाढत चाललेली गुन्हेगारी, अवैध धंद्यांना मिळणारे संरक्षण आणि कायदा-सुव्यवस्थेची बिघडलेली परिस्थिती यामुळे पुण्याची ओळख धोक्यात आली असल्याची टीका त्यांनी केली. हडपसरमधील बनावट दारूचा अड्डा फोडण्यात आला असून भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

बनावट दारूमुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

See also  राष्ट्रपतींनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले - विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे