पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसमधील प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या मद्यधुंद चालकाला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना रविवारी १४ जून रोजी सायंकाळी पिंपरी-चिंचवडमधील भक्ती-शक्ती चौक परिसरात घडली. या घटनेमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील परेल डेपोची एसटी बस (क्रमांक एमएच-09 ईएम-9042) पुण्यावरून मुंबईकडे रवाना होणार होती. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बस सुटण्याची वेळ झाल्यानंतरही चालक बराच वेळ बसकडे आला नव्हता. यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. चालक बसमध्ये आल्यानंतर त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने काही महिला प्रवाशांना त्याने मद्यसेवन केल्याचा संशय आला.
एसटीमध्ये महिला वाहक (कंडक्टर) तसेच महिला प्रवासी मोठ्या संख्येने असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रवासी महिलांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर निगडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चालक रामदास कृष्णा मेश्राम याला ताब्यात घेतले. संबंधित परिसराची हद्द देहूरोड पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येत असल्याने पुढील कारवाईसाठी आरोपी चालकाला देहूरोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलिसांनी चालकाला वैद्यकीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात पाठविले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन रात्री सुमारे दहाच्या सुमारास बदली चालकाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर संबंधित एसटी बस मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.
या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मद्यधुंद अवस्थेत बस चालविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवासी व त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. तसेच महिला कर्मचारी व महिला प्रवासी असताना अशा प्रकारचा निष्काळजीपणा कसा घडला, याबाबत एसटी प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही होत आहे.
प्रवाशांच्या सजगतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असली तरी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी एसटी महामंडळाने अंतर्गत तपासणी यंत्रणा अधिक सक्षम करावी आणि नागरिकांची दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.















