मुळशी, प्रतिनिधी : शिवसेना युवासेना मुळशी तालुक्याच्या वतीने, सेठ ताराचंद हॉस्पिटल व टिळक आयुर्वेदिक विद्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने आंदगाव (ता. मुळशी) येथे सर्वरोग निदान शिबिर, मोफत औषध वाटप तसेच अल्पदरात शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन शिवसेना मुळशी तालुका प्रमुख सचिन खैरे, जिल्हा संघटक संतोष दादा मोहोळ, भारतीय विद्यार्थी सेना पुणे जिल्हा संघटक राम गायकवाड, ज्येष्ठ शिवसैनिक नामदेव आप्पा टेमघरे, अरुण वीर आणि कैलास मारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी वयोवृद्ध नागरिक, महिला वर्ग तसेच विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. शिबिरादरम्यान विविध आजारांची तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक त्या रुग्णांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. याशिवाय अल्पदरात उपलब्ध होणाऱ्या शस्त्रक्रियांची माहिती आणि मार्गदर्शनही देण्यात आले.
कार्यक्रमात तालुका प्रमुख सचिन खैरे आणि जिल्हा संघटक राम गायकवाड यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक जनजागृतीचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
सदर शिबिराचे आयोजन युवासेना उपजिल्हाधिकारी अमित कुडले, समीर शिंदे, आकाश भरेकर, विजय मारणे, अमित मारणे, सागर येणपुरे आणि वसंत उभे यांनी केले. शिबिरात एकूण १७३ नागरिकांनी सहभाग घेतला असून सर्व लाभार्थ्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम यशस्वी ठरल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.
















