आरपीआयच्या दणक्याने मनपा जागी; पाषाण-सुतारवाडीला वाढीव पाणीपुरवठ्याचे आश्वासन

पुणे, प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेने नुकतेच एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकात पाषाण, सुतारवाडी आणि सुसरोड परिसराला केवळ २ ते ३ तास पाणीपुरवठा तर इतर अनेक भागांना ५ ते ६ तास पाणीपुरवठा देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. या असमान पाणीपुरवठ्याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त करत पुणे महापालिकेकडे निवेदन सादर केले.

समान आणि न्याय्य पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला. पक्षाच्या निवेदनाची तातडीने दखल घेत पुणे महापालिकेच्या चतुर्श्रुंगी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्री. साळुंखे यांनी पाषाण, सुतारवाडी आणि सुसरोड परिसरातील पाणीपुरवठ्यात एक ते दीड तास वाढ करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संतोष गायकवाड आणि दत्ता चव्हाण यांनी महापालिकेकडे निवेदन सादर करून स्थानिक नागरिकांच्या पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार असून, पाणीपुरवठ्याबाबत समानतेचे धोरण राबविण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

See also  पुणे महानगरपालिका हद्दीत दुषित पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न; विकसकांवर कारवाईची अमोल बालवडकर यांची मागणी