पुणे, प्रतिनिधी : बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज, रस्ते आणि पाणी या तीन प्रमुख मूलभूत समस्यांबाबत बालेवाडी वेलफेअर फेडरेशनने थेट राज्य सरकारच्या पातळीवर पाठपुरावा सुरू केला असून हा प्रश्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास विभागापर्यंत पोहोचविण्यात आला आहे.
बाणेर-बालेवाडी परिसरात वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र (सब-स्टेशन) उभारण्याची मागणी फेडरेशनकडून सातत्याने करण्यात येत होती. फेडरेशनच्या पाठपुराव्यानंतर २०२४ मध्ये सब-स्टेशनसाठी जागा उपलब्ध झाली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या प्रकल्पाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने फेडरेशनने महावितरण, महापारेषण तसेच लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा केला आहे.
पाणीटंचाईच्या प्रश्नावरही फेडरेशनने सातत्याने आवाज उठविला आहे. २०२३ मध्ये नागरिकांच्या आंदोलनानंतर ३.८ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आणि पाणीपुरवठ्याची समस्या काही प्रमाणात कमी झाली. तरीही परिसरातील अनेक गृहनिर्माण संस्थांना वर्षभर टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. आगामी काळात उभारल्या जाणाऱ्या गगनचुंबी इमारतींमुळे परिसरातील लोकसंख्या सुमारे ३५ ते ४० हजारांनी वाढण्याची शक्यता असून वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा कसा केला जाणार, असा प्रश्न फेडरेशनने विभागीय आयुक्त तसेच पुणे महापालिकेकडे उपस्थित केला आहे.
परिसरातील अपुरे आणि अर्धवट रस्ते हाही अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आहे. भूमी अधिग्रहणाच्या अडचणींमुळे अनेक रस्त्यांची कामे रखडली असून यासाठी शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे फेडरेशनचे म्हणणे आहे.
स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून या प्रश्नांचे समाधानकारक निराकरण होत नसल्याने फेडरेशनने थेट मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून परिसरातील वास्तव परिस्थितीची माहिती देण्यात आली असून लवकरच फेडरेशनच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री यांच्यासोबत भेट होण्याची शक्यता आहे.
याशिवाय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही समस्यांची मांडणी करण्यात आली असून त्यांच्या स्तरावर आवश्यक कार्यवाही सुरू झाल्याची माहिती फेडरेशनने दिली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची भेट घेऊनही परिसरातील प्रश्न मांडण्यात आले असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत समस्यांच्या निराकरणाचे आश्वासन दिले आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनाही निवेदन देऊन परिसरातील मूलभूत सुविधांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
या संपूर्ण पाठपुराव्यात बालेवाडी वेलफेअर फेडरेशनचे मोरेश्वर बालवडकर, शकील सलाती, सचिन पाटील, दफेदार सिंह, आशिष कोटमकर, सुनील गाळणकर आणि रमेश रोकडे यांनी विविध स्तरांवर भेटीगाठी घेऊन बाणेर-बालेवाडीतील मूलभूत प्रश्न मंत्रालयापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.
















