प्रभाग क्र. ९ मधील रस्ते दुरुस्तीसाठी महापालिका आयुक्तांची भेट; सुतारवाडी रस्त्यासाठी निधीची मागणी

पुणे : प्रभाग क्र. ९ मधील मुख्य रस्ते तसेच अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या तातडीने दुरुस्तीसाठी भाजप कोथरूड विधानसभा उत्तर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यासह पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

या शिष्टमंडळाने आयुक्तांसह अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर, प्रजित नायर आणि ओमप्रकाश दिवटे यांच्याशी चर्चा करत प्रभागातील रस्त्यांवरील वाढते खड्डे, वाहतुकीतील अडथळे, नागरिकांना होणारा त्रास आणि अपघातांचा धोका याकडे लक्ष वेधले. खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

बैठकीत सुतारवाडी मुख्य रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करून हे काम त्वरित सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली. यासंदर्भात सविस्तर निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

निवेदनाची दखल घेत आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित विभागाला आवश्यक सूचना देण्यात येतील तसेच रस्ते दुरुस्तीची कामे आणि सुतारवाडी मुख्य रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या वेळी भाजप कोथरूड विधानसभा उत्तर मंडळाचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजप युवा मोर्चा उत्तर मंडळाचे अध्यक्ष अनिकेत चांदेरे, प्रतीक साबळे तसेच औंध-बाणेर प्रभाग समितीच्या अध्यक्षा व नगरसेविका रोहिणी सुधीर चिमटे उपस्थित होत्या.

प्रभागातील नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे रोहिणी चिमटे यांनी सांगितले.

See also  महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे; जगताप, बनसोडे सोमवारी अर्ज भरणार तर महेश लांडगे मंगळवारी अर्ज भरणार