पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांची प्रेक्षक दालनातून जोरदार घोषणाबाजी

पुणे, प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षक दालनातून सरकारी शाळांच्या खाजगीकरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. आकांक्षा एज्युकेशन फाउंडेशनला निधी देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.

आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आर्थिक अडचणींचे कारण देत पुणे महानगरपालिकेने काही शाळा सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर खाजगी संस्थांकडे चालविण्यास दिल्या आहेत. यापैकी आकांक्षा एज्युकेशन फाउंडेशन ही संस्था परकीय आणि स्थानिक सीएसआर निधीच्या माध्यमातून शाळा चालवत असून, सीएसआर निधी अपुरा पडत असल्याचे कारण देत संस्थेने पालिकेकडे प्रति विद्यार्थी सुमारे २७ हजार रुपये देण्याची मागणी केली आहे. स्थायी समितीने हा प्रस्ताव मान्य केल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत आम आदमी पार्टीने तीव्र आक्षेप नोंदवत म्हटले की, सरकारी शाळा सीएसआर निधीवर चालविण्याचा निर्णयच शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यासाठी लज्जास्पद आहे. आता शाळांचा ताबा खाजगी संस्थांकडे ठेवून त्यांचा खर्च सरकारी तिजोरीतून करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

पक्षाच्या मते, दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकारी शाळांचे रूपांतर उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेनेही स्वतःच्या शाळांचा दर्जा उंचावण्यावर भर द्यावा, अशी मागणी करण्यात आली. पुण्यातील काही शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याची घोषणा यापूर्वीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती, त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचेही पक्षाने नमूद केले.

आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी असा दावा केला की, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर येथे अशा प्रकारे एकूण २७ शाळा पीपीपी तत्त्वावर चालवल्या जात आहेत. पुण्यातील प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात आणखी शाळा खाजगी संस्थांकडे देण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

शिक्षकांच्या वेतनात, शैक्षणिक पात्रतेच्या निकषांमध्ये आणि विद्यार्थी संख्येच्या अटींमध्ये फरक निर्माण होऊन सरकारी व कंत्राटी शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी म्हटले. तसेच खाजगी शाळांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या तुलनेत या संस्थेला अधिक निधी का दिला जात आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

पुणे महानगरपालिकेने शिक्षणाचा अधिकार आणि संविधानिक जबाबदारी लक्षात घेऊन स्वतःच्या शाळा अधिक सक्षमपणे चालवाव्यात व शाळांच्या खाजगीकरणाचा मार्ग अवलंबू नये, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

या आंदोलनात मुकुंद किर्दत, अभिजित मोरे, अमित म्हस्के, रविराज काळे, सतीश यादव, किरण कद्रे, ऋषिकेश कानवटे, शुभम चव्हाण, नितीन कुटे पाटील, संजय कोणे, अक्षय म्हस्के, महादेव कापरे आणि प्रदीप उदागे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

See also  बालभारती ते पौडफाटा रस्त्यासंदर्भात सर्वंकष चर्चा