पूरमुक्त बोपोडीसाठी महापालिकेची हालचाल; आयुक्तांकडून पूरप्रवण भागांची पाहणी

पुणे : बोपोडी परिसराला दरवर्षी भेडसावणाऱ्या पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी ३ ऑगस्ट रोजी औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पूरप्रवण भागांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले.

आयुक्तांनी हॅरिस ब्रिज परिसर, आदर्श नगर, स्मशानभूमी परिसर, बोपोडी सबवे तसेच चंद्रमणी नगर या भागांची पाहणी केली. या भागांमध्ये दरवर्षी मुळा-मुठा नदीला पूर आल्याने पाणी शिरते आणि शेकडो नागरिकांचे स्थलांतर करावे लागते. त्यामुळे नदी सुधार प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण करून पूरनियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी नगरसेविका सपना आनंद छाजेड यांनी स्थानिक नागरिकांच्या अडचणी, वारंवार उद्भवणारी पूरस्थिती आणि त्यातून होणारे नुकसान याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. बोपोडीला दरवर्षीच्या पूराच्या संकटातून कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी प्रशासनाने दीर्घकालीन आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, या कामांचा पुढील आढावा घेण्यासाठी गुरुवारी आयुक्तांच्या दालनात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून, पूरमुक्त आणि सुरक्षित बोपोडीसाठी आवश्यक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

पाहणीवेळी माजी उपमहापौर परशुराम वाडेकर, सनीदादा निम्हण, भक्तीताई गायकवाड, भाजप उत्तर मंडळ अध्यक्ष आनंद छाजेड यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

See also  पुण्यातील वाढते अपघात यासाठी पोलीस महानगरपालिका व लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज -खासदार मेधा कुलकर्णी