सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारक समितीची स्थापना

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक उभारण्याच्या उद्देशाने आज सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच माध्यम क्षेत्रातील मान्यवरांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वानुमते “राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ” स्थापन करण्यात आली.

बैठकीत महात्मा गांधी स्मारक उभारण्याची आवश्यकता आणि त्यामागील व्यापक सामाजिक भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, सामाजिक सलोखा, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचा संदेश संपूर्ण जगाला दिला. त्यांच्या विचारांचा वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच विद्यापीठ परिसरात लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी महात्मा गांधी स्मारकाची उभारणी ही काळाची गरज असल्याची भूमिका उपस्थित मान्यवरांनी मांडली.

महात्मा गांधी स्मारकाची उभारणी ही केवळ एका स्मारकाची निर्मिती नसून सामाजिक ऐक्य, शांतता, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे जतन व प्रसार करण्याचा व्यापक सामाजिक उपक्रम असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. हा विषय केवळ विद्यापीठ प्रशासनापुरता मर्यादित नसून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन पुढे नेण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या बैठकीला मा. उल्हासदादा पवार, अरुण खोरे, महावीर जोंधळे, लक्ष्मीकांत देशमुख, विकास देशपांडे, इंदुमती जोंधळे, अन्वर राजन, दीप्तीताई चौधरी, प्रशांत जगताप, गोपाल तिवारी, शरद जावडेकर, नितीन पवार, प्रा. हर्ष जगझाप, डॉ. प्रदीप आवटे, गोविंद भंगुरे, गोपालकृष्ण गुणाले, प्रा. ऋषिकेश येवलेकर, सूरज कुलकर्णी, रघुनाथ चव्हाण, समाधान फुगे, अक्षय कांबळे, ऋत्विक धनवटे, सिद्धांत जांभुळकर, साहेबराव शिरसाट तसेच विद्यापीठातील अनेक तरुण विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यानुसार मा. उल्हासदादा पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रशांत जगताप आणि नितीन पवार यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. प्रा. हर्ष जगझाप यांची सचिवपदी तर सिद्धांत जांभुळकर यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली.

तसेच, स्मारकाच्या उभारणीसंदर्भातील विविध तांत्रिक बाबींचा अभ्यास व नियोजन करण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक समितीची स्थापना करण्यात आली असून, त्या समितीच्या प्रमुखपदी गोपाल तिवारी यांची निवड करण्यात आली.

See also  व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी दिलेली माहितीच अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्तीला ग्राह्य धरावी - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महात्मा गांधींचे प्रेरणादायी स्मारक उभारण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.