पुणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बोपोडी परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीची गंभीर दखल घेत नगरसेविका सौ. सपना आनंद छाजेड यांनी ‘खड्डेमुक्त बोपोडी’ अभियानाला वेग दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे बुजविण्याच्या कामाचा आढावा घेतला.
नागरिकांकडून खडकी रेल्वे स्टेशन रोड, अमर हाइट्स परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गणेश नगर, नाईक चाळ तसेच इतर भागांतील धोकादायक खड्ड्यांबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यानंतर छाजेड यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्येक ठिकाणी भेट देत कामाला गती दिली.
विशेष म्हणजे, त्यांनी केवळ सूचना देण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून खड्डे योग्य पद्धतीने भरले जात आहेत का, याची पाहणी केली. कोणताही खड्डा अपूर्ण राहू नये आणि कामाचा दर्जा राखला जावा, यासाठी त्यांनी काम पूर्ण होईपर्यंत घटनास्थळी थांबून देखरेख केली.
पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्यामुळे दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. संभाव्य अपघात टाळण्यासाठी पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच खड्डे बुजविण्याची मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सपना छाजेड म्हणाल्या, “विकास म्हणजे केवळ मोठी कामे नव्हेत; नागरिकांना दररोज सुरक्षितपणे प्रवास करता यावा आणि त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे, हीच खरी लोकसेवा आहे.”
या अभियानामुळे बोपोडी परिसरातील रस्ते अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
















