पुणे : पुण्यात सरकारने दिलेल्या जागेवर तसेच शासन व महानगरपालिकेच्या प्रचंड सवलती लाटून थाटण्यात आलेल्या दीनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालयात अक्षरश: माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला. केवळ पैसे भरले नाहीत म्हणून सौ. तनिषा भिसे या गर्भवती भगिनीला उपचार नाकारण्यात आले. उपचाराअभावी या भगिनीचा मृत्यू झाला आणि जुळी बाळे मातेला पोरकी झाली. त्यास पूर्णपणे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मुर्दाड प्रशासन जबाबदार असून त्याविरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामार्फत निषेध आंदोलन करण्यात आले.
शरद पवार मुख्यमंत्री असताना पुणेकरांना धर्मादाय रुग्णालयामार्फत आरोग्य सेवा मिळेल या हेतूने मंगेशकर कुटुंबियांना सरकारची हजारो कोटी रुपयांची ही ६ एकर जागा मोफत दिली. परंतु, या हॉस्पिटल प्रशासनाने धर्मादाय हॉस्पिटलचे सर्व नियम धाब्यावर बसवून केवळ धनदांडग्यांसाठीच हे हॉस्पिटल असल्याचे वारंवार सिद्ध केले आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवण्याची तरतूद असतानाही त्याची अंमलबजावणी केली जात नाही. हे हॉस्पिटल केवळ पैसे लुबाडण्याचे केंद्र बनवले गेले आहे. एकीकडे शासनाकडून भरमसाठ सवलती मिळवायच्या आणि दुसरीकडे तब्बल २७ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत ठेवायचा असा प्रकार रुग्णालयाकडून सुरू आहे. काही हजार रुपयांच्या थकीत मालमत्ताकराची पुणेकरांच्या घरी जाऊन, बँड वाजवून करवसुली करणारे महानगरपालिका प्रशासन रुग्णालयाकडून २७ कोटींची करवसुली करताना मूग गिळून गप्प आहे.
या रुग्णालयाला सौ. तनिषाताईच्या मृत्यूस जबाबदार धरून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शासनाने मोफत दिलेली जमीन परत घ्यावी, रुग्णांची लूट करून प्रचंड माया जमविलेल्या रुग्णालय प्रशासन, मंगेशकर कुटुंबिय आणि डॉक्टरांची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी या आंदोलनावेळी करण्यात आली.
या आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घर ताज्या बातम्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या मुजोरीचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार...