बाणेर, बालेवाडी वीज उपकेंद्राची कामें युद्धपातळीवर व्हावीत -आमदार सिद्धार्थ शिरोळे 

पुणे : शिवाजीनगरमधील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी बाणेर, बालेवाडी या दोन उपकेंद्रांची (सबस्टेशन्स) कामें युद्धपातळीवर व्हावीत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत वीजपुरवठ्यावरील लक्षवेधी सूचनेवर आज (शुक्रवारी) बोलताना केली.

शिवाजीनगर मतदारसंघात बालेवाडी, बावधन आणि म्हाळुंगे या वेगाने वाढणाऱ्या भागांना एनसीएल उपकेंद्रातून (सबस्टेशन) वीज पुरवठा केला जातो. या परिसरात लोकवस्ती वेगाने वाढल्यामुळे एनसीएल उपकेंद्रावर भार पडत आहे. याचा थेट फटका शिवाजीनगर भागाला बसत असून येथील वीज पुरवठा वारंवार विस्कळीत होतो, असे आमदार शिरोळे यांनी सभागृहात सांगितले.

यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी २२०/२२ (केव्ही) बालेवाडी आणि २२०/२२ (केव्ही) बावधन या वीज उपकेंद्रांना मंजुरी मिळाली आहे. बालेवाडी उपकेंद्रासाठी जागा संपादित झाल्या आहेत, निविदा मंजुरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ११० मेगावॅट क्षमतेच्या या उपकेंद्राची कामे पुर्ण होण्यास दोन वर्ष लागतील, असे सांगितले जाते, परंतु युद्धपातळीवर हे काम होणे गरजेचे आहे. या उपकेंद्रामुळे एनसीएल उपकेंद्रावरील ताण कमी होईल. तांत्रिक बिघाड झाल्यास शिवाजीनगर परिसरासाठी ही उपकेंद्र उपयोगी ठरतील.

बावधन उपकेंद्राला (सबस्टेशन) अजून जागा मिळाली नसून शासनाने सदर उपकेंद्रासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शिवाजीनगरमधील जनतेला या त्रासातून लवकर मुक्त करण्यासाठी या दोन्ही उपकेंद्रांची (सबस्टेशन) कामे युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

See also  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन