पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांसाठी प्रस्तावित विविध विकासकामांचा निधी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत फेरविचाराचा प्रस्ताव आणून रद्द करण्यात आला असून, हा निर्णय राजकीय वैमनस्यातून घेण्यात आल्याचा आरोप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला आहे. बजेट मंजूर असतानाही प्रत्यक्षात ‘झिरो बजेट’ मिळाल्याची पुणे महानगरपालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
प्रभाग क्रमांक ९ मधील रस्ते, ड्रेनेज, उद्याने तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित विविध विकासकामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय हस्तक्षेपातून महानगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या विषयाचा फेरविचार करण्याचा प्रस्ताव मुख्य सभेत आणण्यात आला आणि अखेर संबंधित विकासकामांचा निधी रद्द करण्यात आल्याचा आरोप बालवडकर यांनी केला.
यापूर्वी प्रभागातील विकासकामे आणि निधीतील कामांचे ‘स्पेशल ऑडिट’ करण्याचा विषय पुढे आणण्यात आला होता. त्यानंतर आता प्रत्यक्ष विकासकामांचा निधीच रद्द करण्यात आल्यामुळे हा प्रकार केवळ अमोल बालवडकर यांच्या विरोधातील राजकीय भूमिका नसून प्रभाग क्रमांक ९ मधील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासावर परिणाम करणारा निर्णय आहे, असे बालवडकर यांनी म्हटले आहे.
“राजकीय मतभेद माझ्याशी असतील तर राजकीय पातळीवर लढा. मात्र त्यासाठी प्रभाग क्रमांक ९ मधील जनतेच्या हक्काची विकासकामे रोखणे योग्य नाही. रस्ते, ड्रेनेज, उद्याने आणि मूलभूत सुविधा ही माझी वैयक्तिक कामे नसून नागरिकांची गरज आणि त्यांचा हक्क आहे,” असे अमोल बालवडकर म्हणाले.
निधी रद्द झाल्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील अनेक नियोजित विकासकामांना खीळ बसणार असून त्याचा थेट फटका नागरिकांना बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“स्वतः काम करायचे नाही आणि दुसऱ्यालाही काम करू द्यायचे नाही, अशी ‘ना काम करुंगा, ना करने दुंगा’ भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याचे या निर्णयातून स्पष्ट होते. राजकीय वैमनस्यातून जनतेच्या विकासकामांमध्ये अडथळे आणणे हे कोथरूडच्या नागरिकांवर अन्याय करणारे आहे,” अशी टीका अमोल बालवडकर यांनी केली.
मात्र, अशा राजकीय अडथळ्यांमुळे प्रभागाच्या विकासाची गती थांबणार नाही, असे स्पष्ट करत बालवडकर म्हणाले, “स्व. अजितदादा पवार यांनी नेहमीच विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत काम करण्याचा विचार दिला. त्यांचा हाच विकासाचा विचार पुढे नेत आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार आणि खासदार पार्थदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ९ आणि परिसरातील विकासकामे यापुढेही अधिक जोमाने आणि ताकदीने सुरू ठेवणार आहोत. राजकीय अडथळे कितीही आले तरी जनतेच्या विकासासाठी आमचे काम थांबणार नाही.”
महानगरपालिकेचा विकास निधी हा कोणत्याही व्यक्तीचा नसून नागरिकांच्या करातून त्यांच्या सुविधांसाठी उपलब्ध होणारा निधी आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील रद्द करण्यात आलेल्या विकासकामांच्या निधीचा निर्णय तातडीने मागे घेऊन सर्व नियोजित विकासकामे पूर्ववत सुरू करण्यात यावीत, अशी मागणी अमोल बालवडकर यांनी केली.
“राजकीय संघर्ष जरूर करा; पण त्यासाठी प्रभाग क्रमांक ९ आणि कोथरूडच्या नागरिकांचा विकास वेठीस धरू नका,” असे आवाहनही त्यांनी केले.
















