अतिवृष्टीचा फटका: पुणे–मुंबई दोन्ही महामार्ग पुढील आदेशापर्यंत बंद; लोणावळा परिसरात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

पुणे, दि. ६ जुलै : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, खबरदारीचा उपाय म्हणून पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

लोणावळा परिसरातील कनेक्टिंग लिंकवरही दरड कोसळल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दोन्ही महामार्गांवरील वाहतूक बंद केली आहे.

महामार्ग बंद झाल्यामुळे पुणे आणि मुंबई या दोन प्रमुख शहरांमधील संपर्क काही प्रमाणात विस्कळीत झाला असून, प्रवासी, मालवाहतूक तसेच अत्यावश्यक सेवांवरही त्याचा परिणाम होत आहे. अनेक वाहनांच्या रांगा लागल्या असून, नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आणि मार्ग सुरक्षित झाल्याची खात्री झाल्यानंतरच वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा प्रशासन व वाहतूक विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

See also  ‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर वाद – आम आदमी पक्षाच्या खासदार संजय सिंह यांची चित्रपट विना काटछाट प्रदर्शित करण्याची मागणी