सोनम वांगचुक यांना वंदे मातरम् संघटनेचा जाहीर पाठिंबा; धर्मेंद्र प्रधान यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन

पुणे : वंदे मातरम् संघटना आणि संयुक्त युवा फिनिक्स सोसायटी यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा देत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी व निदर्शने केली. निषेधाचे प्रतीक म्हणून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या छायाचित्राला काळे फासण्यात आले तसेच जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला.

यावेळी संघटनेने प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या. त्यामध्ये सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीचा विचार करून त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, पंतप्रधानांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, देशातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून आवश्यक सुधारणा कराव्यात तसेच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व इतर आवश्यक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, पुढील आठ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

या आंदोलनात वंदे मातरम् संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे, शहराध्यक्ष अमोल जगताप, आयटी व माहिती अधिकार अध्यक्ष विशाल शिंदे, विद्यार्थी अध्यक्ष आकाश जामगे, किरण केकाणे, आदित्य मुगळे, गिरीश धुमाळ, सम्यक मांडोळे, तुषार गिरी, राज घाटे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

See also  समता पर्व कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 258 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण