२५ वर्षे जुनी जलवाहिनी; शास्त्रीनगरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा, नागरिकांचा संताप

कोथरूड : कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरातील मराठा महासंघ सोसायटीत गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर पाणीपुरवठा समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत असून, कमी दाबाने पाणी येणे, काही घरांमध्ये पाणीच न येणे तसेच गटारमिश्रित दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील पाण्याची लाईन सुमारे २५ वर्षे जुनी असून, सध्या ती अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. एका लाईनवर सुमारे २० कुटुंबांचा भार असून, अनेक घरांमध्ये पाणी पोहोचत नाही. त्यामुळे नागरिकांना दररोज इतर भागातून पाणी भरून आणावे लागत आहे.

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील काही घरांमध्ये नळातून गटारमिश्रित पाणी येत असून ते उकळून वापरण्याची वेळ आली आहे. तसेच महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयालाही नियमित व स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या संदर्भात महानगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी करूनही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. “आम्ही नेमके कसे जगायचे? पिण्याच्या पाण्यात गटाराचे पाणी मिसळत आहे, तरीही कोणी दखल घेत नाही,” अशी व्यथा स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.

नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याची खंत व्यक्त केली आहे. वाढती लोकसंख्या आणि जुनाट जलवाहिनी यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली असून, महानगरपालिकेने तातडीने नवीन जलवाहिनी टाकून नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

See also  बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांचा विक्रमी विजय