प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार का? उमेदवारी कोणाला?

बाणेर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार एकत्रित येण्याचे संकेत सातत्याने दिले जात आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजित पवार यांचे भेट घेत चर्चा देखील केली आहे. यामुळे जवळपास दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे राजकीय वर्तुळात निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९, सुस बाणेर पाषाण मध्ये राजकीय समीकरणे बदलण्याचे शक्यता निर्माण झाली आहे.

आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वामध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये निवडणुका लढवल्या जाण्याचे संकेत आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे, संदीप बालवडकर हे प्रबळ दावेदार मानले जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रमोद निम्हण, पूनम विधाते, बाबुराव चांदेरे, राहुल बालवडकर, समीर चांदेरे हे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर तिकीट वाटपाचा तिढा या परिसरात निर्माण होणार आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गटामध्ये सध्या उमेदवारी शोध सुरू असला तरी सुतारवाडी परिसरातून कोकाटे, सुतार यांच्यापैकी एखादी उमेदवारी राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात असून याबाबत काही जणांकडून विचारणा झाल्याचे देखील सांगितले जात आहे.

उर्वरित तीन जागांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार असून शरद पवार यांच्या पक्षाला सध्या दोन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला दोन जागा अशाप्रकारे वाटप होण्याची शक्यता वर्तवली जात असून यामुळे भाजपापुढे आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वात प्रभावी आव्हान तयार करण्याचे संकेत सध्या दिले जात आहेत. प्रभाग नऊ मध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला याकडे सर्वांचे लक्ष वेधले असून दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र येणार का याकडे देखील लक्ष वेधले आहे.

See also  वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक विकास आवश्यक - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील