आषाढी एकादशीनिमित्त राधेश्वरी नगरात पंढरीच्या वारीचा भक्तिमय सोहळा उत्साहात संपन्न

वाघोली (प्रतिनिधी): आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री गुरुदेव दत्त मंदिर, राधेश्वरी नगर, वाघोली येथे आयोजित करण्यात आलेला पंढरीच्या वारीचा भक्तिमय दिंडी सोहळा हजारो भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने, भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा वारसा जपत पुढील पिढीपर्यंत संस्कृती व संतपरंपरेचे संस्कार पोहोचावेत, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याला राधेश्वरी नगर व परिसरातील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या दिंडीत भगवान श्री विठ्ठल, माता रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, वासुदेव तसेच विविध संतांच्या आकर्षक वेशभूषेत बालवारकरी आणि भाविक सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर, अभंग आणि “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

यावेळी विठूचा गजर’ या भक्तिगीतावर बालकलाकारांनी सादर केलेल्या मनमोहक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक **रिंगण सोहळा, विसावा, संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर फुगडी तसेच विविध पारंपरिक खेळ** यामुळे उपस्थितांना प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीचा आनंद अनुभवता आला.दिंडी मार्गावर विविध ठिकाणी भाविकांनी पालखीचे रांगोळी, पूजन व पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत केले. संपूर्ण मार्गावर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे दर्शन घडले.

दिंडीचा समारोप भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या आरतीने व पसायदानाने आणि हरिनामाच्या गजरात झाला. त्यानंतर परिसरातील रहिवाशांनी भक्तिभावाने बनवून आणलेल्या खिचडी प्रसाद सर्व भाविकांना वाटप करण्यात आला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने सामूहिक अन्नदानाचा हा उपक्रम विशेष आकर्षण ठरला.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व सेवेकरी, स्वयंसेवक, महिला भगिनी, युवक, बालवारकरी तसेच विविध संतांच्या वेशभूषा साकारणाऱ्या कलाकारांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सेवेकरी, वेशभूषाधारक कलाकार आणि उपस्थित हजारो भाविकांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. यापुढेही आषाढी एकादशी निमित्त राधेश्वरी नगरात पंढरीच्या वारीचा हा भक्तिमय सोहळा दरवर्षी अधिक भव्य, दिव्य आणि उत्साहपूर्ण स्वरूपात आयोजित करण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी यावेळी दिली.

See also  सुस रोड वरील सायकल ट्रॅक चे कठडे काढण्याची पालिकेकडे मागणी:राहुल कोकाटे