सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मालवण येथे आयोजित ‘नौदल दिन २०२३’ कार्यक्रमाला प्रधानमंत्री यांची उपस्थिती

सिंधुदुर्ग, दि. 4 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग येथे आयोजित ‘नौदल दिन 2023’ च्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित होते. सिंधुदुर्ग येथील तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची ‘थरारक प्रात्यक्षिके ’ यांचे त्यांनी निरीक्षण केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रधानमंत्री म्हणाले की, मालवण, तारकर्ली किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग हा भव्य किल्ला, वीर शिवाजी महाराजांचे वैभव आणि राजकोट किल्ल्यावरील त्यांच्या नेत्रदीपक पुतळ्याचे लोकार्पण आणि भारतीय नौदलाचा जयघोष आणि ४ डिसेंबर या ऐतिहासिक दिवसामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाचे मन उत्कटता आणि उत्साहाने भारावून गेले आहे.मोदी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीरांपुढे नतमस्तक झाले.

सिंधुदुर्गच्या विजयी भूमीवर नौदल दिन साजरा करणे हा खरोखरच अभूतपूर्व अभिमानाचा क्षण आहे असे प्रधानमंत्री म्हणाले. “सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो”. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा उल्लेख करत सांगितले की कोणत्याही देशासाठी नौदल क्षमतेचे महत्त्व ते जाणून होते. ज्यांचे समुद्रावर नियंत्रण आहे त्यांच्याकडे अंतिम सत्ता आहे या शिवाजी महाराजांच्या घोषणेचा पुनरुच्चार करत प्रधानमंत्री म्हणाले की, त्यांनी शक्तिशाली नौदलाची उभारणी केली. कान्होजी आंग्रे, मायाजी नाईक भाटकर, हिरोजी इंदुलकर या योद्ध्यांपुढे नतमस्तक होत ते आजही प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने प्रेरित होऊन आजचा भारत गुलामगिरीची मानसिकता झुगारून पुढे मार्गक्रमण करत आहे असे प्रधानमंत्री म्हणाले. नौदल अधिकार्‍यांच्या गणवेशावरील मानचिन्ह (इपॉलेट्स) आता छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि ठेवा अधोरेखित करतील कारण हे नवीन मानचिन्ह नौदलाच्या प्रतीक चिन्हाशी साधर्म्य साधते याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी गेल्या वर्षी नौदलाच्या ध्वजाचे अनावरण केल्याची आठवण सांगितली. आपल्या वारशाचा अभिमान बाळगत प्रधानमंत्री यांनी घोषणा केली की भारतीय नौदल आता भारतीय परंपरेनुसार आपल्या पदांचे (रँक) नामकरण करणार आहे. सशस्त्र दलांमध्ये नारी शक्ती मजबूत करण्यावरही त्यांनी भर दिला. नौदलाच्या जहाजात भारताच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरच्या नियुक्तीबद्दल मोदी यांनी भारतीय नौदलाचे अभिनंदन केले.

See also  पुण्याच्या हिंजवडी आयटी परिसरातील समस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  घेतला आढावा

दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. सिंधुदुर्ग येथील ‘नौदल दिन 2023’ सोहोळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारशाला आदरांजली अर्पण करतो, ज्यांच्या राजमुद्रेद्वारे नवीन नौदल चिन्हाची प्रेरणा मिळाली; ज्याचा स्वीकार गत वर्षी पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतच्या जलावतरणावेळी करण्यात आला.

दरवर्षी, नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दले यांच्याद्वारे ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ आयोजित करण्याची परंपरा आहे. ही ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ लोकांना भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या बहु-डोमेन कार्यान्वयनाच्या विविध पैलूंचे साक्षीदार बनण्याची संधी देतात. असे राष्ट्रीय सुरक्षेतील नौदलाच्या योगदानावर प्रकाश टाकतात आणि नागरिकांमध्ये सागर विषयक जाणीव-जागृती करतात.

प्रधानमंत्री यांनी अनुभवलेल्या क्रियात्मक प्रात्यक्षिकांमध्ये कॉम्बॅट फ्री फॉल, हाय स्पीड रन्स, स्लिदरिंग ऑप्स ऑन जेमिनी अँड बीच असॉल्ट, एसएआर डेमो, व्हीईआरटीआरईपी आणि एसएसएम लाँच डिल, सीकिंग ऑप्स, डंक डेमो आणि सबमरीन ट्रान्झिट, कामोव्ह ऑप्स, न्यूट्रलायझिंग एनिमी पोस्ट, स्मॉल टीम इन्सर्शन – एक्स्ट्रॅक्शन (एसटीआयई ऑप्स), फ्लाय पास्ट, नेव्हल सेंट्रल बँड डिस्प्ले, कंटिन्युटी ड्रिल, हॉम्पाइप डान्स, लाइट टॅटू ड्रमर्स कॉल आणि सेरेमोनिअल सनसेट यांचा समावेश होता. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.