पुणे : आमचा पणजोबा, नवश्या, आजोबा धाकल्या हे तारपा वाद्य वाजवायचे. त्यानंतर धाकल्याचा मुलगा लाडक्या, नि लाडक्याचा मुलगा मी, भिकल्या, तारपा वाजवतो. हे वाद्य आमची वंशावळ आहे. आता माझ्या नातू, पणतू शिकत आहेत. त्यांच्याबरोबर साठ-सत्तर लोक शिकवले, अशी भावना प्रसिद्ध तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांनी व्यक्त केली.देवाने आपल्याला जन्म दिला. मनाला विचारून आपण विचार करायचा असतो. विचारांनी आचार केला, तरच विकास होतो, असेही त्यांनी सांगितले.रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्ती निमित्त आयोजित वाद्यपूजन सोहळ्याप्रसंगी पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचा सत्कार यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित वाद्यपूजन सोहळ्यात आमदार हेमंत रासने, दिपकभाऊ नागपुरे, नगरसेवक राजेंद्र काकडे, नगरसेवक अपूर्व खाडे, नगरसेविका पुजा जागडे, अभिनेते रमेश परदेशी(पिट्याभाई ), नितीन पंडीत, आशिष कांटे, देवेंद्र वडके, अमित पळसकर,शिरीष थिटे, गणेश देशपांडे, मयुर ढमाले, यांच्यासह शहरातील विविध वाद्यपथकांतील, गणेशोत्सव मंडळांतील पदाधिकारी उपस्थित होते. याच कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष अमर भालेराव यांनी पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांची माहिती आणि ट्रस्टच्या वतीने घेण्यात येणार्या ‘इन्स्टाग्राम रील’ स्पर्धेची माहिती दिली.
गणेशोत्सवाची ख्याती जगभर आहे आणि ढोल-ताशा ही पुण्याची संस्कृती आहे. आम्ही ढोल-ताशा वादक आहोत म्हणून रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्ती निमित्त एका संस्कृतीकडून आणि वादकाकडून दूसर्या वादक संस्कृतीचा सन्मान व्हावा याच उद्देशाने पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचा सत्कार करण्यात आला, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अमर भालेराव यांनी दिली.सदर कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्ट अध्यक्ष अमर भालेराव ,श्रीनिवास निगडे ,अमोल शुक्ल ,तुषार दामगुडे ,अमित घुले ,निलेश वावरे यांनी केले आणि ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी मार्गदर्शन केले . महाराष्ट्राची संस्कृती जतन करण्याचे कार्य आपलेच आहे, तेच कार्य आम्ही केले आहे.
धिंडा म्हणाले, आमचा तारपा देवासाठी वाजतो. देवकार्याचं वाद्य आहे. हे वाद्य श्वासाने वाजतं. वारा येतो, तेव्हा झाड हलतं, तसं तारप्याला श्वास दिला की ते वाजतं. माडाचं पान, दोन बांबू आणि त्याला दुधी जोडलेली, असं हे वाद्य बनवलं जातं. तारप्यात नर आणि मादी आहे. शरीराला जेवढा श्वास, तेवढा श्वास या दोन्हींनाही घालायचा.
गणेशोत्सवाला 135 वर्षांची भव्य परंपरा आहे. सुरुवातीला कार्यकर्ते स्वतः मंडप घालायचे, सजावट करायचे. लोकवर्गणी केली जायची. दोन महिने आधी उत्सव आल्याची जाणीव व्हायची. आता वाद्यपथकांची उद्घाटने झाली की, गणेशोत्सव आला असे वाटते. प्रत्येक वेळी टप्पा बदलत गेला. या काळात धर्म-संस्कृती-परंपरा जपण्याचे काम गणेशोत्सवाने केले आहे, असे मत रासने यांनी व्यक्त केले.
















