विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बाणेरमध्ये मोर्चा; राष्ट्रगीताला सलामी देणाऱ्या पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक

बाणेर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी बाणेर येथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शांततापूर्ण निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. बालेवाडी फाटा या वर्दळीच्या चौकात झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

आंदोलनाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. राष्ट्रगीत सुरू होताच बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सावधान स्थितीत उभे राहत राष्ट्रगीताला मानवंदना दिली. त्याचवेळी सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांनीही आपली वाहने थांबवून राष्ट्रगीताचा सन्मान राखला. या प्रसंगामुळे परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

राष्ट्रगीत संपल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे कोणताही मोठा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला नाही आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली.
कर्तव्य बजावत असतानाही राष्ट्रगीताबद्दल दाखविलेला आदर आणि कर्तव्यनिष्ठेची भावना याबद्दल उपस्थित नागरिकांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अजय कदम, भानुप्रताप बर्गे तसेच राज्याचे विशेष पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीताला दिलेल्या सन्मानाचे अभिनंदन केल्याची माहिती आंदोलनाच्या आयोजकांकडून देण्यात आली.

See also  महाळुंगे येथे राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ पुनम विधाते यांचा पत्रके वाटप करून प्रचार