बाणेर : बाणेर-बालेवाडी परिसरासाठी अभिमानाची बाब ठरत, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उमाताई गाडगीळ आणि अस्मिताताई करंदीकर यांची विविध शैक्षणिक संस्थांच्या नियामक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.
माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या सकारात्मक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत उमाताई गाडगीळ यांची डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अस्मिताताई करंदीकर यांची एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, लोणी काळभोर येथील नियामक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.
या दोन्ही मान्यवर महिलांच्या नियुक्तीमुळे बाणेर-बालेवाडी परिसराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा, दूरदृष्टीचा आणि कार्यक्षम नेतृत्वाचा शैक्षणिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच मोलाचा उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शिक्षण क्षेत्रात सक्षम नेतृत्वाला संधी देण्याबरोबरच महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याची भूमिका प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
उमाताई गाडगीळ आणि अस्मिताताई करंदीकर यांचे त्यांच्या नव्या जबाबदाऱ्यांसाठी सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
















