मुळशी तालुक्यात जिओ नेटवर्क सेवा ढासळली; ग्रामीण भागात टॉवर व फायबर नेटवर्क वाढविण्याची शिवसेनेची मागणी

मुळशी : मुळशी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जिओ नेटवर्कची सेवा मोठ्या प्रमाणात ढासळल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः तालुक्यातील धरण विभाग, मुठा खोरे व कोळवण खोरे या दुर्गम भागांमध्ये अपुरे मोबाईल टॉवर व फायबर नेटवर्क असल्यामुळे नागरिकांना सातत्याने नेटवर्क समस्येला सामोरे जावे लागत आहे.

मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ, बँकिंग व्यवहार करणारे नागरिक गुगल पे फोन पे मोठ्या प्रमाणात वापरले जाते तसेच ऑनलाइन सेवांवर अवलंबून असलेले अनेक जण मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आपत्कालीन परिस्थितीतही संपर्क साधणे किंवा मदतीचा संदेश पाठविणे कठीण होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन मुळशी तालुक्यात जिओ कंपनीने नवीन मोबाईल टॉवर उभारावेत, फायबर नेटवर्कचा विस्तार करावा आणि ग्रामीण भागात दर्जेदार नेटवर्क सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने पुणे येथील जिओ व्यवस्थापक केळकर साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन खैरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य राम गायकवाड, युवासेना उपजिल्हाप्रमुख अमित कुडले, सरपंच प्रशांत जोरी, मुकेश लोयरे, सुभाष जोरी, विजय मारणे, सचिन सावंत, नितिन लोयरे,समीर शिंदे ,रमेश मोगल उपस्थित होते. नागरिकांच्या हितासाठी जिओ कंपनीने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

See also  लिंगभाव संवेदनीकरण: जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न