“सिद्धिविनायका आता तरी पावशील का?” – औंधमध्ये स्वच्छतेचा बोजवारा; ९०० कामगार असूनही कचऱ्याचे साम्राज्य

औंध : – औंध क्षेत्रीय कार्यालय परिसरातील कचऱ्याची गंभीर समस्या आणि त्याकडे असलेले प्रशासनाचे दुर्लक्ष याबाबत नगरसेवक सनी निम्हण  यांनी स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त आयोजित नियोजन बैठकीत आवाज उठवला होता. त्यानंतर पुणे महानगरपालिकेने औंध परिसराच्या सफाईचे काम ‘सिद्धिविनायक’ या संस्थेला देण्याचे निश्चित केले.

दि. १ ऑगस्ट पासून पुढील तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर या संस्थेला काम देण्यात आले आहे. या कामासाठी केवळ औंध क्षेत्रीय कार्यालयात तब्बल ९०० कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधीचे चित्र अत्यंत निराशाजनक आहे.

एखादी संस्था जेव्हा मोठी जबाबदारी स्वीकारते, तेव्हा प्रायोगिक काळात ती आपले सर्वस्व पणाला लावून विश्वास निर्माण करेल, अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात इथे विरोधाभासी चित्र दिसत आहे. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग तसेच आहेत.याबाबत पालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांची तीच जुनी उत्तरे मिळतात – “सांगून ऐकत नाहीत, काम वेळेवर करत नाहीत, आम्हाला अधिकार नाहीत, एक महिन्यानंतर दंडात्मक कारवाई करता येईल.”

प्रोफेशनल संस्थेची निवड करूनही जर “मागचे दिवस पुढे” अशीच परिस्थिती राहणार असेल, तर नागरिकांच्या कराचा पैसा आणि पालिकेचा वेळ दोन्ही वाया जाणार आहे. ही परिस्थिती औंध-बोपोडी प्रभागाची आहे, पण इतर प्रभागातही फार वेगळे चित्र नसेल असा अंदाज आहे.

याप्रकरणी महापालिकेने तातडीने लक्ष घालावे. पालिका आणि संबंधित संस्था यांच्यात समन्वय असावा, संस्थेकडून यापुढे असे होणार नाही याची लेखी ग्वाही घ्यावी आणि नियमभंग झाल्यास तात्काळ कारवाई करण्याचे अधिकार पालिकेकडे राहतील अशी व्यवस्था करावी, अशी मागणी नगरसेवक सनी निम्हण यांनी केले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हे चित्र पाहून एकच प्रश्न पडतो – कचऱ्यापासून स्वातंत्र्य कधी मिळणार?  असा प्रश्न देखील निम्हण यांनी उपस्थित केला आहे.

See also  श्री  देवी चतुःशृंगी मंदिरात घटस्थापना