बाणेर-पाषाण लिंक रोडचा १५ वर्षांचा भूसंपादनाचा तिढा अखेर सुटला! ६८ कोटींचा मोबदला अदा; जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू, रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागण्याची शक्यता

पुणे | पुणे बुलेटिन : पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बाणेर-पाषाण लिंक रोडच्या भूसंपादनाचा गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या रस्त्यासाठी अंतिम निवाडा (अवॉर्ड) जाहीर करण्यात आला असून, सुमारे ६८ कोटी रुपयांचा मोबदला अदा करण्यात आला आहे. त्यानंतर पुणे महानगरपालिकेने प्रत्यक्ष जागेचा ताबा घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे बाणेर, पाषाण, सुतारवाडी आणि परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुणे महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार (डीपी) मौजे पेठ पाषाण येथील सर्व्हे क्रमांक १३४ (पैकी) ते १३८ आणि १४० मधून जाणारा ३६ मीटर रुंदीचा बाणेर-पाषाण लिंक रोड प्रस्तावित आहे. मात्र, आवश्यक जागेचे भूसंपादन पूर्ण न झाल्यामुळे या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. परिणामी, परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण होत होता.

आता भूसंपादनाची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सुमारे ६८ कोटी रुपयांची भरपाई रक्कम अदा करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून अंतिम निवाडा जाहीर झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेने प्रत्यक्ष जागेचा ताबा घेण्याची मोहीम सुरू केली आहे. ताबा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या उर्वरित कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पातील भूसंपादनाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, भूसंपादन व व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त निखिल मोरे यांच्यासह संबंधित उपअभियंते, कनिष्ठ अभियंते तसेच मालमत्ता विभाग, बांधकाम विभाग आणि पथ विभागाने विशेष प्रयत्न केले.

विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन आणि पुणे महानगरपालिका यांच्यातील समन्वयामुळे भूसंपादनाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बाणेर, पाषाण, सुतारवाडी आणि लगतच्या परिसरात वाढत्या नागरीकरणामुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत बाणेर-पाषाण लिंक रोड पूर्ण झाल्यास परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यास मदत होऊ शकते.

See also  जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक- फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

जागेचा प्रत्यक्ष ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पथ विभागामार्फत रस्त्याचे उर्वरित काम तातडीने हाती घेऊन तो लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. १५ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागल्याने आता प्रत्यक्ष बांधकाम किती वेगाने पूर्ण होते आणि नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा कधी मिळतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.