म्हाळुंगे : म्हाळुंगे गावातील नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्यांसाठी गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून गावातील माजी सरपंच रेखाताई पाडळे, माजी सरपंच नामदेवराव गोलांडे, उद्योजक सोपानराव पाडळे, सुरेश पाडळे व सचिन पाडळे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
म्हाळुंगे गावातील ऑर्चिड हॉटेल ते व्हीटीपी बांधकाम प्रकल्पापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, तसेच ड्रेनेज लाईन आणि पावसाळी पाण्याची लाईन टाकण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पावसाळ्यात या परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ही कामे तातडीने पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली.
नागरिकांच्या मागणीची दखल घेत चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषाताई नागपुरे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथजी भिमाले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक बजेट उपलब्ध करून देत रस्ता, ड्रेनेज आणि पावसाळी लाईनची कामे सुरू करण्याच्या सूचना केल्या.
त्यानंतर म्हाळुंगे गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने महापौर मंजुषाताई नागपुरे यांची भेट घेऊन या समस्यांबाबत सविस्तर निवेदन दिले. यावेळी महापौरांनी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश बनकर तसेच ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता गोजारे यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
सध्या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात येतील, तर पावसाळ्यानंतर मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याच्या लाईनचे कामही पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
या निर्णयामुळे म्हाळुंगे गावातील नागरिकांना दिलासा मिळणार असून, रस्ता, पाणी निचरा आणि वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
















