पुणे, प्रतिनिधी: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत २२ ऑगस्ट रोजी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राहुल गांधी यांनी ही ऐतिहासिक मोहीम हाती घेतली असून, या कार्यक्रमात अधिकाधिक विद्यार्थिनी सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रयत्न करावेत. पुढील पाच दिवसांत प्रत्येक कार्यकर्त्याने किमान १०० मुलींचे नोंदणीकरण करावे, यासाठी दररोज २० मुलींची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सपकाळ बोलत होते. “दुसऱ्यावर टीका करणे सोपे असते; मात्र आपण काँग्रेस पक्षासाठी नेमके काय प्रयत्न करतो, याचे प्रत्येक कार्यकर्त्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, आमदार विश्वजित कदम, राहुल गांधी यांचे सहकारी मनोज त्यागी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, प्रवक्ते हनुमंत पवार, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा व माजी आमदार दिप्ती चवधरी, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे, उपाध्यक्ष कैलास गायकवाड, प्रदेश पदाधिकारी अमिर शेख, राजेंद्र शिरसाट, प्रदेश सोशल माध्यम प्रमुख ऋषिकेश पाटील, खजिनदार चंद्रशेखर कपोते उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वसुधा निरभवने, सुरेखा परिहार, अनिता खरात, कल्पना पडळकर, सुनीता हजारे, ऋषिकेश चव्हाण, ऋषी ओव्हाळ आणि सनी परमार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यशोमती ठाकूर यांनी पुणे शहरातील युवक मोठ्या संख्येने एकत्र येतात, अशा ठिकाणी कार्यक्रमाचे फलक लावण्याच्या सूचना केल्या. तसेच सामाजिक माध्यमांसह एलईडी पडदे असलेल्या वाहनांच्या माध्यमातून शहरात प्रचार करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकत्र यावे आणि अधिकाधिक युवतींना कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे. “निष्ठेने काम करा, आपली वेळ येत आहे. आगामी काळात सर्वांना न्याय मिळेल,” असे ठाकूर म्हणाल्या.
विश्वजित कदम म्हणाले, पुणे हे विद्येचे माहेरघर आणि क्रांतिकारी शहर आहे. शहरातील प्रत्येक गल्लीत काँग्रेसचा कार्यकर्ता आढळतो. राहुल गांधी विद्यार्थिनींशी संवाद साधण्यासाठी पुण्यात येत असून, युवा पिढीशी संवाद साधण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम आहे. ‘छात्रों की गूंज’चे टी-शर्ट तयार करण्यात आले असून, ते परिधान करून तरुणांमध्ये जाऊन कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड. निलेश बोराटे यांनी केले, तर माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी आभार मानले.
















