जितोच्या वतीने भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन

पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणे चॅप्टरच्या वतीने ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’च्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीस सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शहराच्या विविध भागांतून एकाच वेळी निघालेल्या या रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. नवकार महामंत्र सामूहिक जप सोहळ्याबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

९ एप्रिल रोजी सकाळी ७:०२ ते ९:३६ या वेळेत एस. पी. कॉलेज ग्राउंड, टिळक रोड, पुणे येथे नवकार महामंत्राचा सामूहिक जप करण्यात येणार आहे. भारतासह १०८ देशांतील नागरिक या दिवशी एकत्रितपणे नवकार महामंत्र पठण करीत विश्वशांती व विश्वकल्याणासाठी प्रार्थना करणार आहेत.

दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार असून, ते स्वतः नवकार महामंत्राचा जप करतील आणि नंतर देशवासियांना संबोधित करतील. पुण्यातील कार्यक्रमस्थळी पंतप्रधानांचे भाषण थेट प्रक्षेपणाद्वारे दाखविण्यात येणार आहे.

सदर उपक्रमाचे आयोजन जितो पुणेच्या वतीने करण्यात आले असून, अधिकाधिक नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जितोचे चेअरमन इंद्रकुमार छाजेड, चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी लक्ष्मीकांत खाबिया आणि मीडिया कोऑर्डिनेटर अभिजित डुंगरवाल यांनी केले आहे.

See also  लोहिया नगर परिसरात स्वच्छता व जलस्त्रोतांची निगा याबाबत जनजागृती रॅली