पौड : मुळशी तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि विकासकामांबाबत आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.
भोर-राजगड-मुळशीचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री महोदयांना भेटले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य व भाजप गटनेते शिवाजी बुचडे-पाटील आणि माजी नियोजन समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते अमित कंधारे उपस्थित होते.
या भेटीत मुळशी तालुक्याला भेडसावणाऱ्या अडचणी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. विशेषतः तालुक्यातील ५२ गावांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावण्याबाबत चर्चा झाली. या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते अमित कंधारे यांनी यापूर्वी उपोषण देखील केले होते.
शिष्टमंडळाने मांडलेल्या प्रमुख मागण्या : मुळशी तालुक्यासाठी टाटा धरणातून दोन टीएमसी पाणी उपलब्ध करून देणे.तालुक्यातील ५२ गावांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावणे. माण गावातील एमआयडीसीचे शिक्के कमी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे.तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी पीएमआरडीएकडून आवश्यक निधी मंजूर करणे.तालुक्यातील विकासकामांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक आयोजित करणे.
या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
या भेटीमुळे मुळशी तालुक्यातील पाणी, रस्ते, एमआयडीसी आणि इतर विकासकामांच्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळेल आणि नागरिकांच्या मागण्यांना न्याय मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
















