हडपसर, दि. २९ : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरावा, या उद्देशाने स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग स्कूल, डी.पी. रोड, माळवाडी, हडपसर येथे अनोख्या पद्धतीने पर्यावरणपूरक रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील झाडांना पर्यावरणपूरक राख्या बांधून झाडांच्या संरक्षणाचा संकल्प केला. ‘झाडे हीच आपली खरी जीवनदायी संपत्ती आहे’ असा संदेश देत विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.
शाळेचे मुख्याध्यापक विनायक पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णाली काटमोरे, अस्मिता माने आणि अनुराधा शिंदे या शिक्षिकांसह शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमाचे आयोजन व नियोजन अक्षयकुमार कांबळे सर यांनी केले.
झाडांपासून आपल्याला प्राणवायू, सावली, फळे तसेच अनेक जीवनावश्यक गोष्टी मिळतात. त्यामुळे वृक्षतोड रोखणे, झाडांचे संरक्षण करणे आणि अधिकाधिक वृक्षारोपण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे विद्यार्थ्यांना यावेळी समजावून सांगण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी झाडांचे संरक्षण करणे, अनावश्यक वृक्षतोड न करणे, अधिकाधिक वृक्षारोपण करणे आणि लावलेल्या झाडांची नियमित काळजी घेणे, अशी पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली.
‘एक राखी निसर्गासाठी, एक संकल्प पर्यावरणासाठी’ या संकल्पनेतून साजरा झालेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना रुजविण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा सामाजिक संदेश देणारा ठरला.
















