पुणे : पाषाण–सुतारवाडी रस्त्याच्या विकासासाठी निधी मंजूर झाल्यानंतर या कामाला गती देण्यासाठी सुतारवाडी मुख्य रस्ता तसेच सुतारवाडी सर्व्हिस रोडची पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
यावेळी रस्त्याची सद्यस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रस्त्याच्या विकासासाठी आवश्यक असलेली संपूर्ण जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच जागा ताब्यात घेण्यासह इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याच्या कामास कोणताही विलंब न करता तातडीने सुरुवात करावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
पाषाण–सुतारवाडी मार्ग हा परिसरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून, या रस्त्यावर वाढती वाहतूक आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे नियोजित विकासकाम पूर्ण झाल्यानंतर सुतारवाडी तसेच बाणेर परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या पाहणीदरम्यान औंध-बाणेर प्रभाग समितीच्या अध्यक्षा रोहिणी चिमटे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, तसेच पथ विभागाचे कार्यकारी अभियंता बनकर, वाघमारे, रंधाळे आणि पाटील यांच्यासह पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
















