संख्यात्मक वाढीपेक्षा विद्यार्थ्यांची गुणात्मक वाढ होणे गरजेचे : डॉ.विश्वजीत कदम; भारती विद्यापीठात शिक्षक दिन उत्साहात साजरा

पुणे दि.०५ : येणारी पिढी आधीच तंत्रज्ञान आत्मसात केलेली असल्यामुळे त्यांना त्याच्या पुढचे ज्ञान देऊन संख्यात्मक वाढीपेक्षा विद्यार्थ्यांची गुणात्मक वाढ होणे गरजेचे आहे असे मत भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि प्र-कुलगुरू डॉ.विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठात शिक्षक दिन समारंभात ते बोलत होते.

यावेळी कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, कुलगुरू डॉ.विवेक सावजी, आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता जगताप, सहकार्यवाह डॉ.एम.एस.सगरे, डॉ.के.डी.जाधव, कुलसचिव जी.जयकुमार, भारती विद्यापीठ रविंद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या अध्यक्षा स्वप्नाली विश्वजीत कदम उपस्थित होते.

पुढे डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, भारती विद्यापीठातील प्राध्यापकांचा राष्ट्रीय संशोधनातील  सहभाग अधिक वाढून गुणात्मक काम होण्यासाठी पब्लिकेशन्सची परकीय चलनातील फी भारती विद्यापीठ भरणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. शिक्षण क्षेत्रातील अनेक आव्हाने पेलून जगातील विद्यापीठांच्या यादीत भारतातील विद्यापीठांचा समावेश होईल असा विश्वास त्यांनी  यावेळी व्यक्त केला.

कुलपती डॉ.शिवाजीराव कदम म्हणाले, भारती विद्यापीठाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात बहुमोल योगदान देऊन महिला शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांना सक्षम बनवले. प्राध्यापकांनी अध्यापनांबरोबर संशोधनाला सर्वोच्च प्राधान्य देऊन संशोधनाची संस्कृती अधिक विकसित करावी.

प्रा.मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. के. डी. जाधव यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. ज्योती मंडलिक यांनी केले. या कार्यक्रमात  प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकांचा सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

See also  वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन त्रिसूत्रीवर काम करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आढावा बैठक